स्वतंत्र विदर्भावरून केंद्रीय भाजपमधील मतभेद आज चव्हाटय़ावर आले. स्वतंत्र विदर्भाचे लेखी आश्वासन भाजपने निवडणुकीत दिलेले नाही. परंतु विदर्भाची निर्मिती आमची कमिटमेंट असल्याचे ठोस प्रतिपादन केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केले. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन दिले नसल्याचे भर पत्रकार परिषदेत सांगून विदर्भातील भाजप नेत्यांना तोंडघशी पाडले होते. आता गडकरी यांनी अमित शहा यांच्या विपरीत भूमिका घेत विदर्भाची निर्मिती करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा एकदा स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शिवसेनेने ‘सामना’तून विदर्भाच्या मुद्दय़ावर भाजपला चिमटे काढले आहेत. या पाश्र्वभूमीवर गडकरी यांनी स्वतंत्र विदर्भाचा पुन्हा एकदा जोरदार पुरस्कार केला.
वर्षभरात झालेल्या कामकाजाची माहिती देताना गडकरी म्हणाले की, केंद्र सरकारचे दुसरे वर्ष संपता संपता देशात २५ लाख रोजगार निर्माण होतील. देशाच्या जीडीपीमध्ये जहाजबांधणी व दळणवळण खात्याच्या माध्यमातून दोन टक्क्यांनी वाढ होईल. यापूर्वी जहाजबांधणी क्षेत्रात परदेशावर अवलंबून होतो. आता मात्र भारतातच तंत्रज्ञान विकसित केले जाईल. पुढील तीन महिन्यांत सुमारे साडेतीन लाख कोटी रुपयांची विकासकामे पूर्ण करणार असल्याची महत्त्वाकांक्षी घोषणा गडकरी यांनी केली.

अमित शहा यांच्या विधानाचा प्रसारमाध्यमांनी विपर्यास केला. भाजपने विदर्भाचे लेखी आश्वासन दिले नाही. मात्र १९९३-९४ साली भुवनेश्वर येथे झालेल्या पक्षाच्याराष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत छोटय़ा राज्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्यात विदर्भाच्या निर्मितीचा प्रस्तावदेखील होता.
 – नितीन गडकरी</strong>