शेतकऱयांसंदर्भात माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी लोकसभेत दिले. शून्यकाळात गडकरी यांनी स्वतःहून निवेदन करीत कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिले.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱयांचे झालेल्या नुकसानाबाबत दोन दिवसांपूर्वी लोकसभेत नियम १९३ अंतर्गत चर्चा करण्यात आली. या चर्चेत सहभागी होताना राहुल गांधी यांनी गडकरींच्या वक्तव्याचा उल्लेख केला होता. शेतकऱयांनी देवावर किंवा सरकारच्या भरवशावर राहू नये, असे गडकरी यांनी एका सभेत म्हटल्याचे राहुल गांधी यांनी सभागृहात सांगितले.
राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर गडकरी यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, सभागृहात राहुल गांधी यांच्याकडून माझ्याबद्दल चुकीची माहिती देण्यात आली आहे. शेतकऱयांच्या मेळाव्यात बोलताना मी म्हटले होते की शेतकऱयांवर सारखी नैसर्गिक संकटे येत आहेत. मात्र, त्यांनी हताश होऊ नये आणि आत्महत्याही करू नये. त्यांनी शेतातून उत्पादन वाढविण्यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. सरकार शेतकऱयांना मदत देण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, शेतकऱयांनी केवळ सरकारच्या भरवशावर राहू नये. असे आपण म्हटले होते, असे गडकरी यांनी सांगितले. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.