‘पूर्ती’ कारखान्याच्या कर्जप्रकरणी नियमांचे उल्लंघन झाले असल्याचा अहवाल कॅगने दिल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून संसदेत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना घेरले असल्याने अखेर मंगळवारी गडकरी यांनी त्याबाबतचे स्पष्टीकरण दिले. आपण काहीही चुकीचे केलेले नाही, आपल्याविरुद्धचे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यास केवळ मंत्रिपदाचाच नाही तर खासदारकीचाही राजीनामा देऊ, अशी भूमिका गडकरी यांनी स्पष्ट केली.
आपण एक रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचे जगातील कोणत्याही न्यायालयात सिद्ध झाल्यास केवळ केंद्रीय मंत्रिपदाचाच नव्हे तर खासदारकीचाही राजीनामा देऊ. ‘पूर्ती’बाबत आम्ही कोणताही लाभ घेतलेला नाही, कॅगच्या अहवालात आपल्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत, कॅगच्या अहवालाचा विपर्यास करण्यात आला असून राजकीय संधीसाधू जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे गडकरी म्हणाले.
गडकरी यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून काँग्रेसने सभागृहाचे कामकाज रोखले आहे. मंगळवारीही काँग्रेसने कॅगच्या अहवालासंदर्भात चौकशीची मागणी केली. पूर्ती कारखान्यात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही, विरोधकांच्या सर्व प्रश्नांना हवी तेव्हा आणि कितीही वेळा उत्तरे देण्यास आपण तयार आहोत, मात्र आपल्याला राजकारण करावयाचे असल्यास तो वेगळा प्रश्न आहे, असेही गडकरी म्हणाले.
पक्षात तळागाळात काम करून आपण आजमितीला या पदापर्यंत पोहोचलो आहे, आपली व्यक्तिगत माहिती सादर करून या पदापर्यंत पोहोचलेलो नाही. कर्ज घेणे हा भ्रष्टाचार आहे का, व्याजासह कर्ज फेडणे हा भ्रष्टाचार आहे का, असे सवाल गडकरी यांनी केले. कॅगच्या अहवालात घोटाळा झाल्याचा उल्लेख नाही, असेही ते म्हणाले.
पूर्तीला कर्ज मंजूर झाले तेव्हा केंद्रात आणि महाराष्ट्रात यूपीएचे सरकार होते. त्या वेळी आपण मंत्री, भाजपचा अध्यक्ष अथवा मंत्रीही नव्हतो, आयआरईडीएकडून जास्तीत जास्त कर्ज देण्यात आले. कॅगचा अहवाल आपल्याविरुद्ध नव्हे तर आयआरईडीएविरोधात आहे, असेही ते म्हणाले.