केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांची घोषणा

देशातील महामार्ग बांधणीवर आणखी १५ लाख कोटी खर्च करण्यात येतील, तसेच खादी व लघु-उद्योगातील वस्तूंना जागतिक पातळीवर नेऊन आर्थिक वाढीस चालना दिली जाईल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक व लघु-मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

रस्ते वाहतूक व लघु-मध्यम उद्योग खात्याचा कार्यभार घेतल्यानंतर गडकरी यांनी एका मुलाखतीत सांगितले,की महामार्ग व लघु-मध्यम उद्योग खात्याच्या कामातून देशाच्या आर्थिक वाढीला चालना दिली जाईल.  महामार्गाची रूपरेषा तयार असून २२ हरित द्रुतगती मार्गावर १५ लाख कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत. अडकलेले सर्व  प्रकल्प पुढील शंभर दिवसात मार्गी लावण्यात येतील, तसेच  ऊर्जाजाळ्या प्रमाणे रस्त्यांचे जाळे निर्माण केले जाईल.

आधीच्या पाच वर्षांत रस्ते वाहतूक, गंगा स्वच्छता, नदी विकास यावर १७ लाख कोटी खर्च करण्यात आले, त्यात ११ लाख कोटी महामार्गावर खर्च करण्यात आले असे सांगून ते म्हणाले की, नोटाबंदीतून भ्रष्टाचार व काळ्या पैशाविरोधात लोकांमध्ये अपेक्षित संदेश गेला होता. पुढील शंभर दिवसात रखडलेले महामार्ग प्रकल्प मार्गी लावले जातील. २०१४ मध्ये ४०३ प्रकल्प रखडलेले होते, आता २०-२५ प्रकल्प रखडलेले आहेत, भारतीय बँकांची ३ लाख कोटींची अनुत्पादित कर्जे आमच्या कामामुळे निकाली निघाली आहेत. दिल्ली-मीरत द्रुतगती मार्ग दोन महिन्यात पूर्ण केला जाईल. नवी दिल्ली- मुंबई द्रुतगती मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. सध्या दिवसाला ३२ कि.मीचे रस्ते बनतात हे प्रमाण ४० कि.मी करण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे. महामार्ग मंत्रालयाने ११ लाख कोटींची कामे केली, त्यात एक रुपयाचाही भ्रष्टाचार झालेला नाही. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी अपघाताची ८७०४ ठिकाणे शोधण्यात आली असून त्यांची दुरूस्ती करण्यात येईल.

खादी जागतिक पातळीवर नेणार

लघु उद्योगातील वस्तू व खादी उत्पादनांना संयुक्त प्रकल्पाअंतर्गत जागतिक पातळीवर नेले जाईल. मोरिंगा उत्पादनाला जगात मोठी मागणी आहे, असे सांगून ते म्हणाले की, काथ्या उद्योगास उत्तेजन दिले जाईल. सध्या हा उद्योग १० हजार कोटींचा आहे, तो २० हजार कोटींपर्यंत नेला जाईल. त्यातून मोठी रोजगारवाढही होईल, खादीलाही जागतिक पातळीवर नेले जाईल. लघु-उद्योगांचा निर्यातीत ४५ टक्के वाटा आहे. देशांतर्गत उत्पन्नात त्याचा २५ टक्के वाटा असून उत्पादन क्षेत्रात त्यांचा ३३ टक्के वाटा आहे.