वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास जबर दंडाची तरतूद असलेले मोटार वाहन (सुधारणा) विधेयक संसदेच्या संयुक्त निवड समितीकडून मिळाल्यानंतर लवकरच ते ३१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सरकारने सोमवारी सांगितले.

हे विधेयक सध्या संसदेच्या संयुक्त निवड समितीकडे आहे. ते आमच्याकडे आल्यानंतर लगेच ते संसदेच्या येत्या अधिवेशनात आम्ही मांडू शकू अशी मला आशा आहे, असे रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या आरंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात सांगितले.

मोटार वाहन (सुधारणा) विधेयक २०१६ मध्ये वाहतूक नियमांच्या उल्लंघनासाठी कठोर दंडाची तरतूद आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवल्यास १० हजार रुपये दंड आणि हिट-अ‍ॅण्ड-रन प्रकरणांसाठी २ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी लागणार असून, रस्ते अपघातातील मृत्यूसाठी १० लाखांच्या भरपाईची तरतूदही त्यात करण्यात आली आहे.

विधेयकातील तरतुदीनुसार, मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवण्यासाठी १ ते ४ हजार रुपये दंड आकारला जाईल. विनापरवाना वाहन चालवण्याच्या गुन्ह्य़ासाठी २ हजार रुपये दंड आणि/ किंवा ३ महिन्यांची कैद अशी शिक्षा असून, हेल्मेट न घालता दुचाकी चालवल्यास २ हजार रुपये दंड व तीन महिन्यांसाठी वाहनचालक परवाना निलंबित होण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.