केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उपपंतप्रधान द्यावे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान करावे आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे पक्षाच्या नेतृत्वाची धुरा द्यावी, असा सल्ला भाजपाचे ज्येष्ठ नेते संघप्रिय गौतम यांनी पक्षाला दिला आहे. त्याचबरोबर पक्षाचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राज्यसभेवरच ‘फोकस’ करावा असे त्यांनी सांगितले आहे.

उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धार्मिक कार्यास पाठवले पाहिजे, असेही त्यांनी माध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. नरेंद्र मोदी हे देशातील सर्वांत मोठे नेते आहेत. पण २०१९ मध्ये ‘मोदी लाट’ येण्याबाबत शंका असल्याचे ते म्हणाले. आगामी सार्वत्रिक निवडणुकीत ‘मोदी मंत्र’ पुन्हा काम करण्याची शक्यता कमीच आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही हे मान्य आहे. पण ते बोलू शकत नाहीत.

केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात राग पसरला आहे. परिस्थिती इतकी वाईट आहे की, जर आता निवडणुका झाला तर भाजपा काही राज्य वगळता सर्व ठिकाणांहून सत्तेबाहेर जाईल, असा इशारा त्यांनी दिला. योजना आयोगाचे नाव बदलणे, सीबीआय, आरबीआयच्या कार्यात सरकारच्या हस्तक्षेपाबाबत सांगत गौतम यांनी आपल्याच पक्षाच्या कार्यशैलीवर टीका केली. उत्तराखंडमध्ये निवडून आलेले सरकार पाडण्याचा प्रयत्न करणे योग्य नव्हते. त्याचबरोबर मणिपूर आणि गोव्यातही अशाच पद्धतीने सरकार स्थापन करणे ठीक नव्हते.

तत्पूर्वी, महाराष्ट्रात राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले किशोर तिवारी यांनी संघप्रमुख मोहन भागवत यांना पत्र लिहून गडकरी यांना पंतप्रधान करण्याची मागणी केली होती. जर पक्षाला २०१९ मध्ये निवडणुका जिंकायच्या असतील तर त्यांनी गडकरींना पंतप्रधान केले पाहिजे. गडकरी हे दशकांपासून भाजपा आणि संघाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. पंतप्रधानपदासाठी ते अत्यंत योग्य आहेत, असे तिवारी यांनी म्हटले आहे.