अभिनेते रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत देताच भाजपने वेळ न दवडता त्यांच्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रजनीकांत यांना अप्रत्यक्षपणे भाजपमध्ये येण्याचे आमंत्रणच दिले आहे. ‘राजकारणात येण्याचा विचार करत असाल, तर भाजपचा नक्की विचार करा,’ असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना म्हटले आहे.

‘रजनीकांत यांच्यासारख्या लोकप्रिय अभिनेत्यासाठी पक्षात योग्य संधी आहे. रजनीकांत यांचे राजकारणात स्वागत आहे. त्यांनी भाजपचा विचार करावा, ही माझी विनंती आहे. त्यांना पक्षात चांगले स्थान मिळेल,’ असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटल्याचे वृत्त सीएनएन न्यूज १८ ने दिले आहे. ‘हा महत्त्वाचा राजकीय निर्णय असेल. याबद्दल निर्णय घेण्याचे अधिकार माझ्याकडे नाहीत. पक्षाचे अध्यक्ष आणि संसदीय समिती याबद्दल निर्णय घेईल,’ असे नितीन गडकरी यांनी पुढे बोलताना म्हटले.

‘दक्षिण भारतात रजनीकांत यांच्या चाहत्यांची संख्या किती मोठी आहे आणि त्यांना किती मोठा पाठिंबा आहे, याची कल्पनादेखील करता येऊ शकत नाही. ते माणूस म्हणून खूप चांगले आहेत. रजनीकांत मराठी आहेत. त्यांच्या घरी प्रवेश केल्यावर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे छायाचित्र पाहायला मिळते,’ असेदेखील नितीन गडकरी यांनी पुढे म्हटले.

मागील आठवड्यात रजनीकांत यांनी राजकारण आणि व्यवस्थेविषयी भाष्य केले होते. देशातील यंत्रणा सडली असल्याचे विधान करत चाहत्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन रजनीकांत यांनी केले होते. रजनीकांत यांनी राजकारणात येण्याचे संकेत दिल्यावर भाजपने त्यांना पक्षात प्रवेश करण्याचे अप्रत्यक्ष आमंत्रण दिले आहे. रजनीकांत यांनी राजकारणात पाऊल ठेवण्याचे संकेत दिल्याने ते स्वत:चा पक्ष स्थापन करणार की एखाद्या पक्षात प्रवेश करणार, याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

गेल्या आठवडाभरात रजनीकांत यांनी त्यांच्या विधानांमधून राजकारणावर भाष्य केले आहे. रजनीकांत यांनी १९९६ मध्ये राजकीय भूमिका घेतली होती. तमिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता यांच्या सरकारविरोधात मतदान करण्याचे आवाहन त्यावेळी रजनीकांत यांनी केले होते.