व्यावसायिक नितीश कटारा हत्या प्रकरणातील तिन्ही गुन्हेगारांच्या जन्मठेपेची शिक्षा दिल्ली उच्च न्यायालयाने कायम ठेवण्याचा निर्णय दिला.
या प्रकरणाबाबत सत्र न्यायालयाने तीनही गुन्हेगारांना १६ एप्रिल रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात गुन्हेगारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळून दिल्ली उच्च न्यायालयाने तिनही गुन्हेगारांची जन्मठेप कायम ठेवली आहे.
उत्तरप्रदेशातील राजकीय नेते डी.पी.यादव यांचा मुलगा विकास यादव आणि त्याचे भाऊ विशाल, सुखदेव या तिघांना कटारा हत्याप्रकरणात मागील वर्षी १६ एप्रिल रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या तिघांनी २००२ साली नितीश कटारा यांचे अपहरण करून हत्या केली होती. या प्रकरणी सत्र न्यायालयाने तिघांनाही दोषी ठरविले होते. आता जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवल्याच्या निर्णयावर बोलत असताना नितीश कटारा यांची आई नीलम कटारा म्हणाल्या की,”एक भारतीय नागरिक म्हणून आणि एक आई म्हणून न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर समाधानी आहे.”