बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते लालूप्रसाद यादव हे दोन कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी बऱ्याच कालावधीनंतर एकाच व्यासपीठावर आले तरीही या दोघांमधून विस्तव जात नसल्याचे चित्रच स्पष्ट झाले. दोन्ही नेते एकमेकांवर स्तुतिसुमनांचा वर्षांव करतील असे वाटत होते मात्र त्याऐवजी दोघांनी एकमेकांवर शाब्दिक बाणच सोडले.
एका वृत्तपत्राच्या पाटणा आवृत्तीच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी हे दोन राजकीय प्रतिस्पर्धी व्यासपीठावर एकत्र आले. दोन्ही नेत्यांच्या मधोमध केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे बसले होते. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर सोडलेल्या बाणांनी शिंदे आणि उपस्थितांना हसू आवरत नव्हते.
आपल्यासारख्या प्रतिस्पध्र्याच्या बातम्यांची दखल घेतली जाऊ नये यासाठी राज्य सरकार आता प्रसिद्धीमाध्यमांवरही नियंत्रण ठेवू लागले आहेत, असे वक्तव्य लालूप्रसाद यांनी नितीशकुमार यांचा नामोल्लेख टाळून केले. बिहारमधील वृत्तपत्राच्या स्वातंत्र्याबाबत प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष मार्कण्डेय काटजू यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, असेही ते म्हणाले. नितीशकुमार यांनीही आपल्या भाषणाच्या वेळी लालूप्रसाद यांच्यावर नेम धरण्याची संधी सोडली नाही. लालूप्रसाद यांनी ट्विटरवर खाते उघडले त्याचा संदर्भ मुख्यमंत्र्यांनी दिला.
जुन्या पिढीतील काही जण आता सोशल मीडियाला बळी पडत चालले आहेत. नव्या पिढीमध्ये सोशल मीडियाची फॅशन असणे पटण्यासारखे आहे. मात्र जुन्या पिढीतील लोकही त्यांचे अनुकरण करू लागले आहेत असा टोला लगावला.
नितीशकुमार यांचे भाषण सुरू असताना लालूप्रसाद यांनी नितीशकुमार यांच्याकडेच अंगुलीनिर्देश केला. तेव्हा लालूप्रसाद यांचीच बातमी आणि छायाचित्र प्रसिद्ध करा, असे नितीशकुमार म्हणाले. या सर्व प्रकारामुळे गृहमंत्री शिंदे आणि उपस्थितांमध्ये हास्यस्फोटच होत होता.