* नितीशकुमारांकडून पाठीत खंजीर-शहा * राज्याच्या विशेष दर्जाचे काय- नितीशकुमार
अवघ्या देशाचे लक्ष्य लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर आता नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात झाली आहे. एनडीएशी संबंध तोडून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पाठीत खंजीर खुपसल्याची टीका भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारला विशेष दर्जा देण्याच्या आश्वासनाची पूर्तता का केली नाही, असा सवाल नितीशकुमार यांनी केला आहे.
नितीशकुमार यांना ज्येष्ठ नेते जॉर्ज फर्नाडिस यांनी राष्ट्रीय ओळख मिळवून दिली त्यांच्याशीच नितीशकुमार यांनी प्रतारणा केली, जॉर्ज फर्नाडिस सध्या कोठे आहेत, फर्नाडिस यांना अज्ञातवासात राहणे भाग पडले आहे, असे शहा म्हणाले.
एनडीएने नितीशकुमार यांना नेतृत्वाची भूमिका दिली आणि भाजप कार्यकर्त्यांचा होणारा अपमान सहन करून सहकार्य केले, बिहारमध्ये जंगलराज येऊ नये हा त्यामागील उद्देश होता, असे शहा म्हणाले. मात्र त्यांनी सत्तेसाठी लालूप्रसाद यांच्याशी हातमिळवणी करून भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, असा आरोपही शहा यांनी केला.
दरम्यान, मोदी यांनी बिहारला विशेष दर्जा देण्याचे आश्वासन का पाळले नाही, असा सवाल नितीशकुमार यांनी केला आहे. बिहारमध्ये निवडणूक असल्याने मोदी यांनी मोठय़ा घोषणा केल्या, मात्र त्याच वेळी शेजारच्या ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या समस्यांकडे त्यांचे दुर्लक्ष का होत आहे, असेही नितीशकुमार म्हणाले.
नरेंद्र मोदी अनेक प्रश्नांवर एकतर्फी निर्णय घेऊन देशातील संघराज्यीय रचनेला बाधा निर्माण करीत आहेत. मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत न करताच मोदी यांनी अनेक महत्त्वाच्या केंद्रीय पुरस्कृत योजनांचे अर्थसाह्य़ कमी केले त्यामुळे राज्यांवर अतिरिक्त बोजा पडला, असा आरोपही नितीशकुमार यांनी केला. निवडणुकीपूर्वी भाजप संघराज्यीय रचनेबद्दल बोलत होता आणि आता त्यांचे वर्तन नेमके उलटे आहे, असेही नितीशकुमार म्हणाले. केंद्र-राज्य संबंधांबाबत आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत नितीशकुमार यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला.

‘बिहारी’ की ‘बाहरी’!
बिहारमधील जनतेला स्थानिक नेता हवा की बाहेरचा नेता हवा हे राज्यातील जनताच ठरवेल, असे नितीशकुमार म्हणाले. भागलपूरमधील नाथनगर येथील जाहीर सभेत ते बोलत होते. राज्यातील जनतेला ‘बिहारी’ नेता हवा की ‘बाहरी’ (बाहेरचा) याचा निर्णय जनताच घेईल, असेही ते म्हणाले.
आपण स्थानिक आहोत, आपले राज्याशी जवळकीचे नाते आहे, मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए उपरे आहेत, असे नितीशकुमार म्हणाले. बिहारची निवडणूक केवळ स्थानिक प्रश्नांवरच अवलंबून नाही, त्यामुळे देशाला राजकीय दिशा मिळणार आहे, त्यामुळे जनतेने सावधपणे मतदान करावे. भाजपने अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना दूर ठेवल्याची टीकाही नितीशकुमार यांनी केली होती.