बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यातील जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांच्या डीएनएमध्येच काही तरी गडबड आहे, अशी खरमरीत टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर केली.
नितीशकुमार यांना निवडणूक प्रचाराचा नारळ फोडताना त्यांनी लक्ष्य केले. ते म्हणाले की, नितीशकुमार यांनी राजदशी युती केली आहे, ते पुन्हा बिहारला जंगलराजकडे नेत आहेत, त्यामुळे लोकांनी त्यांना मते देऊ नयेत, त्यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवू नये. बिहारमध्ये बदल घडवण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला दोन तृतीयांश बहुमत द्यावे.
बिहारला ५० हजार कोटींपेक्षा जास्त मदत दिली जाईल. नितीशकुमार यांच्याशी युती करून आपण विष पीत आहोत, असे लालू यांनी म्हटले होते त्यावर मोदी यांनी सांगितले, की लालूंना विष पिण्यात रस असला, तरी बिहारच्या लोकांना विष पाजण्याचा त्यांना अधिकार नाही असे सांगितले.

नितीशकुमारांचे सात प्रश्न
पाटणा: नितीशकुमार यांच्यावर नरेंद्र मोदी यांनी टीका केली असतानाच नितीशकुमार यांनी मोदी यांना सात प्रश्न विचारले आहेत. त्यात काळा पैसा भारतात आणण्याचे काय झाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काय मार्ग काढला व बिहारला लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता का झाली नाही, या प्रश्नांचा समावेश आहे.