News Flash

भाजपला डावलून बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार

‘रालोआ’च्या केंद्रीय मंत्रिमंडळात कधीच सहभागी न होण्याचा ‘जदयू’चा निर्णय

(संग्रहित छायाचित्र)

‘रालोआ’च्या केंद्रीय मंत्रिमंडळात कधीच सहभागी न होण्याचा ‘जदयू’चा निर्णय

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रविवारी आपल्या मंत्रिमंडळ विस्तारात आठ मंत्र्यांचा समावेश करताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) आपले मित्रपक्ष भाजप आणि लोक जनशक्ती पक्ष (लोजप) यांना डावलल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.

आपण भाजपला एक मंत्रिपद देऊ केले होते, परंतु तो पक्ष उत्सुक दिसला नाही, असे स्पष्टीकरण नितीश कुमार यांनी केले. जद (सं.)च्या वाटय़ाची मंत्रिपदे रिकामी होती, ती आज भरण्यात आली. भाजपशी मतभेदांचा प्रश्नच उपस्थित होत नाही, सर्व काही ठीक आहे, असे नितीश कुमार यांनी म्हटले असले तरी त्यांचा पक्ष आणि भाजप यांच्यातील संबंध बिघडत चालल्याचे हे लक्षण असल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री नितीश यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री असलेले भाजपचे सुशीलकुमार मोदी यांनी या संदर्भात ट्वीट करून मतभेद नसल्याचे दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. नितीश कुमार यांनी भाजपला मंत्रिपद देऊ केले होते, परंतु ते भविष्यात कधी तरी स्वीकारण्याचा निर्णय पक्षाने घेतला, असे ट्वीट सुशीलकुमार यांनी केले आहे. एनडीए सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी नितीश यांच्या पक्षाला केवळ एक मंत्रिपद देऊ केल्याने त्यांच्यातील तणाव वाढत असल्याचे वृत्त आहे. तथापि, नितीश यांनी मात्र अशा प्रकारच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. केंद्र सरकारमध्ये  सहभागी होण्यास नकार देताना नितीश यांनी, भाजपने सर्व घटक पक्षांना त्यांच्या संख्याबळानुसार मंत्रिपदे द्यायला हवी होती, असे म्हटले होते. त्याचबरोबर आपण सरकारमध्ये सहभागी होणार नाही, असे स्पष्ट करताना नितीश यांनी, भाजपशी मतभेद असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला होता.

नवे मंत्री

नितीश कुमार यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करताना रविवारी नरेंद्र नारायण यादव, श्याम रजक, अशोक चौधरी, बिमा भारती, संजय झा, रामसेवक सिंग, नीरज कुमार आणि लक्ष्मेश्वर राय या आठ मंत्र्यांचा समावेश केला. हे सर्व जद (सं.)चे आहेत. राजभवनावर झालेल्या सोहळ्यात राज्यपाल लालजी टंडन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

लोकसभा निवडणुकीतील जागा

लोकसभा निवडणुकीत भाजप-जद (सं)-लोजप युतीने बिहारमधील ४० जागांपैकी ३९ जागाजिंकल्या. जद (सं)ने १७ जागांपैकी १६ तर, भाजपने १७ पैकी १७ आणि लोजपने सहा पैकी सहा जागा जिंकल्या. काँग्रेसने अवघी एक जागा जिंकली.

नितीशकुमारांचा भाजपला इशारा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी-अमित शहा आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यातील दरी वाढत असल्याचे सांगण्यात येते. या पाश्र्वभूमीवर नितीश यांनी भाजपला डावलून रविवारी केलेला बिहार मंत्रिमंडळाचा विस्तार पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना इशारा असल्याचे मानले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2019 1:02 am

Web Title: nitish kumar bjp janata dal
Next Stories
1 रस्ते अपघातात क्वीन हरीशसह चार लोककलावंतांचा मृत्यू
2 पश्चिम बंगालमध्ये विद्यार्थ्यांना धर्म जाहीर न करण्याची मुभा
3 इस्रायलच्या हवाई हल्ल्यात सीरियातील १० सैनिक ठार
Just Now!
X