मी नोटाबंदीचा पुरस्कर्ता होतो. पण या निर्णयामुळे किती लोकांना फायदा मिळाला, असा सवाल करत काही व्यक्ती आपले पैसे हस्तांतरण करण्यास यशस्वी झाल्याची खंत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्यक्त केली. नोटाबंदीच्या निर्णयावेळी विरोधी पक्षात असलेल्या नितीश कुमार यांनी त्यावेळी  या निर्णयाचे स्वागत केले होते. परंतु, त्यांनी शनिवारी व्यक्त केलेल्या या मतामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ते म्हणाले, पैसे जमा करणे, पैसे देणे किंवा कर्ज देणे इतकेच बँकांचे कार्य नाही. उलट प्रत्येक योजनांमध्ये बँकांची भूमिका वाढली आहे. देशाच्या विकासासाठी सरकार जो पैसा पुरवते. त्याचे योग्य वाटप करण्यासाठी बँकेने आपले तंत्रज्ञान मजबूत केले पाहिजे. बँक ही स्वायत्त आहे. वरपासून खालपर्यंत या वस्तूंकडे बँकेने पाहिले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. पाटणा येथे आयोजित राज्यस्तरीय बँकर्स समितीद्वारे आयोजित त्रैमासिक समीक्षा बैठकीत ते बोलत होते.

तत्पूर्वी मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छाही दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सरकार स्थापण्यास चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शुभेच्छा. हे सरकार जनतेच्या अपेक्षा पुर्ण करेन असा विश्वास आहे, असे ट्विट त्यांनी केले.

बँकिंग संस्थांना आणखी मजबूत करण्याची गरज असल्याचे सांगत बँकांच्या भूमिका दिवसेंदिवस आणखी वाढेल. आरबीआयच्या मानकानुसार पाच हजार लोकसंख्येमागे बँकेची एक शाखा असायला हवी. देशात ११ हजार लोकांमागे बँकेची शाखा आहे. बिहारमध्ये तर हे प्रमाण १६ हजार इतके आहे. यावरून अंदाज लावता येऊ शकतो की, बँकांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढवावी लागणार आहे.