नितीशकुमार यांचे मत; काँग्रेस, डाव्या पक्षांना पुढाकार घेण्याचे आवाहन

देशभरात भाजपचा विजयरथ वेगाने दौडत असताना आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या एकजुटीचे स्पष्ट संकेत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिले आहेत. देशपातळीवर भाजपला रोखण्यासाठी महाआघाडीची गरज असून, त्यासाठी काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन नितीशकुमार यांनी सोमवारी केले.

‘‘बिहारप्रमाणे उत्तर प्रदेशात महाआघाडी स्थापन होऊ न शकल्याने भाजपला तेथे विजय मिळाला. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या मतांची बेरीज केली तर ती भाजपला मिळालेल्या मतांहून १० टक्के अधिक आहे. यामुळे भाजपला रोखण्यासाठी बिहारच्या धर्तीवर देशपातळीवर महाआघाडी स्थापन करण्याची गरज आहे’’, असे नितीशकुमार म्हणाले. देशपातळीवर महाआघाडी झाली तर ती महायशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सत्तेवरून खेचण्यासाठी विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत डाव्या पक्षांच्या काही नेत्यांशी चर्चा करून महाआघाडीसाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती केल्याचे नितीशकुमार यांनी सांगितले.

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत संमिश्र कौल मिळूनही भाजप उगाचच विजयी मानसिकतेत वावरत असल्याचा चिमटा नितीशकुमार यांनी काढला. पंजाबमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले असून, गोवा आणि मणिपूरमध्ये या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकांत भाजपला स्पष्ट कौल मिळाला असे मानणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.

काळ्या पैशाचे काय?

काळ्या पैशाबाबत बोललेल्या लांबलचक गोष्टींचे पुढे काय झाले? असा सवाल करत नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. नोटाबंदीनंतर बेनामी मालमत्तांवर कारवाई का करण्यात आली नाही? असा सवालही त्यांनी केला. नोटाबंदीनंतर जमा केलेल्या ५०० आणि १ हजाराच्या जुन्या नोटांपेक्षा अधिक पैसा बेनामी मालमत्तांवरील कारवाईत सापडेल, असेही नितीशकुमार म्हणाले.