नितीशकुमार यांचा पंतप्रधानांना सवाल; वाराणसीतील सभेत संघ परिवारावर टीकास्त्र; बिहारच्या कायदा-सुव्यवस्थेवरून भाजपची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दारूबंदीबाबत भूमिका जाहीर करावी, अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केली आहे. तसेच बिहारप्रमाणे राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये दारूबंदी करणार काय हे जाहीर करा, असे आवाहन नितीशकुमार यांनी केले.
नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी या मतदारसंघात जाहीर सभेद्वारे नितीशकुमार यांनी संघपरिवारावर टीकास्त्र सोडले. भाजप आता देशभक्तीच्या गप्पा मारत आहे, मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वातंत्र्यलढय़ात सहभाग नव्हता, असा दावा नितीशकुमार यांनी केला. उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपलेल्या असतानाच नितीशकुमार यांनी काळ्या पैशाच्या मुद्दय़ावरून भाजपवर टीका केली. भाजपने प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात १५ ते २० लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिले होते. मात्र लाखाऐवजी १५ ते २० हजार तरी जमा करावेत, असा टोला नितीशकुमार यांनी लगावला.
भाजपमध्ये आता अहंकार आला आहे. लोकसभेला बिहारमध्ये ४० पैकी ३१ जागा जिंकल्यावर विधानसभा निवडणुकीत महाआघाडीने त्यांना पराभूत करून जमिनीवर आणले अशी आठवण करून दिली. बिहारच्या जनतेने मार्ग दाखवला असून, आता उत्तर प्रदेशची वेळ आहे. येथील जनतेने भाजपला धडा शिकवावा, असे आवाहन नितीशकुमार यांनी केले. उत्तर प्रदेशात लोकसभेला ८० पैकी ७३ ठिकाणी भाजप विजयी झाले. जनतेच्या अपेक्षांची पूर्तता झाली काय, याची विचारणा त्यांनी केली. संघपरिवार विकासाच्या गप्पा मारतो, मात्र ‘लव्ह जिहाद’ व ‘घर वापसी’ या मुद्दय़ांवरच भर देत असल्याची टीका नितीशकुमार यांनी केली. बिहारमध्ये प्रचारात भाजपने गोमांसचा मुद्दा उपस्थित केल्याचा उल्लेखही नितीशकुमार यांनी केला.

नितीशकुमार यांच्या राजीनाम्याची भाजपची मागणी
नवी दिल्ली: बिहारमधील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्दय़ावर नैतिक जबाबदारी स्वीकारून नितीशकुमार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे सरचिटणीस व राज्य प्रभारी भूपेंद्र यादव यांनी केली आहे. वाराणसीत नितीशकुमारांनी भाजपवर टीकास्त्र सोडलेले असतानाच, भाजपने त्याला प्रत्युत्तर दिले आहे. जनता दल आमदार पुत्र रॉकी यादव याने खून केल्याचा संदर्भ यादव यांनी दिला आहे. बिहारमध्ये गुन्हेगारी वाढत असल्याचा आरोपही यादव यांनी केला आहे. दारूबंदीची टिमकी वाजवणाऱ्यांना सत्तेची नशा चढली असल्याची टीका भाजपने केली आहे. युवकाच्या हत्येबाबत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चकार शब्दही काढले नसल्याबद्दल भाजपचे चिटणीस श्रीकांत शर्मा यांनी आश्चर्य व्यक्त केले. भाजपशासित राज्यांमध्ये अशा घटनांनंतर राहुल गांधी तातडीने दौऱ्यावर जातात असा टोला शर्मा यांनी लगावला. नितीशकुमार यांनी आधी बिहारची चिंता करावी मग राष्ट्रीय नेतृत्वाची महत्त्वाकांक्षा ठेवावी, असा सल्ला भाजपने दिला आहे.