सध्या एनआरसी आणि सीएएच्या मुद्यावरून केंद्र सरकारचा विरोधीपक्षांकडून जोरदार विरोध केला जात आहे. संयुक्त जनता दलचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी देखील सुरूवातीपासूनच या कायद्यास विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांच्याच पक्षाचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांच्यात शाब्दीक युद्ध रंगल्याचे दिसत आहे. नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांच्यावर निशाणा साधत, जे पक्ष सोडून जाऊ इच्छित आहेत त्यांनी जावे, असे म्हटले आहे. तसेच, तत्कालीन भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या सांगण्यावरून प्रशांत किशोर यांना आपण पक्षात घेतले होते, असा देखील त्यांनी खुलासा केला आहे.

नितीश कुमार म्हणाले, अमित शाह यांच्या सांगण्यावरूनच प्रशांत किशोर यांना आमच्या पक्षात आणले होते. अमित शाह यांनी सांगितले होते की, प्रशांत यांना पक्षात घ्या. मग जर आता त्यांना संयुक्त जनता दलमध्ये राहायचे असेल तर पक्षाच्या ध्येय, धोरणानुसार वागावे लागेल. तसेच, पवन वर्मा यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, आपले मत व्यक्त करण्याचे सर्वांनाच स्वातंत्र्य आहे. कोणी पत्र लिहितं तर कोणी ट्विट करतो.

नितीश कुमार यांच्या या विधानावर प्रशांत किशोर यांनी देखील प्रतिक्रिया दिली, नितीश कुमार यांना जे म्हणायचे होते ते त्यांनी म्हटले आहे. तुम्हाला माझ्या उत्तराची प्रतिक्षा करावी लागेल, मी बिहारमध्ये येऊन याचे उत्तर देणार असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले.

सुधारित नागरिकत्व कायद्यावरून संयुक्त जनता दलाचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी सुरूवीतीपासूनच विरोधाचा सुर आळवला आहे. एवढेच नाहीतर त्यांनी ट्विटकरून सीएए व एनआरसीविरोधात आवाज उठवल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे जाहीर अभिनंदन देखील केले आहे. आता प्रशांत किशोर यांची कंपनी दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी आम आदमी पार्टीची रणनीती बनवण्याचे काम करत आहे. विशेष म्हणजे त्यांचा पक्ष संयुक्त जनता दल दिल्लीतील निवडणुकीत भाजपाबरोबर आहे.