News Flash

नितीश कुमारच बिहारचे मुख्यमंत्री होणार; एनडीएच्या नेतेपदी निवड

सोमवारी दुपारी ४.३० वाजता शपथविधी

संग्रहित (PTI)

जेडीयूचे नेते नितीश कुमार यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) नेतेपदी निवड करण्यात आली आहे. यासोबतच नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. सोमवारी दुपारी ४.३० वाजता शपथविधी पार पडणार असून यावेळी नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. नितीश कुमार सातव्यांदा आणि सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. एनडीएची बैठक आज पार पडली असून त्यानंतर नितीश कुमार यांची नेतेपदी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरुन अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. भाजपाला जास्त जागा मिळाल्याने नितीश कुमार यांच्या हातातून मुख्यमंत्रीपद निसटणार असल्याची शक्यताही वर्तवली जात होती. भाजपा नेत्यांनी एकीकडे नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील असं स्पष्ट केलं असताना नितीश कुमार यांनी मात्र मौन बाळगलं होतं. यासोबतच आपण मुख्यमंत्रीपदावा दावा केला नसल्याचंही म्हटलं होतं. पण अखेर एनडीएच्या बैठकीत नितीश कुमार यांची नेतेपदी निवड करत चर्चांना पूर्णविराम देण्यात आला आहे.

बिहारमध्ये सरकार स्थापन करण्यासंबंधी भाजपा, जेडीयू, हिंदुस्तानी आवाम मोर्चा (एचएएम) आणि विकासशील इन्सान पार्टी (व्हीआयपी) यांची नितीश कुमार यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली.

बिहारमध्ये एनडीएने १२२ जागांसहित बहुमत मिळवलं आहे. भाजपाला ७४ जागा मिळाल्या आहेत. तर दुसरीकडे नितीश कुमार यांच्या पक्षाला जिथे २०१५ मध्ये ७१ जागा मिळाल्या होत्या तिथे यावेळी ४३ जागांवरच विजय मिळवता आला. भाजपाच्या जागा मात्र ५३ वरुन ७४ वर पोहोचल्या. यासोबत भाजपा बिहारमध्ये मोठा भाऊ ठरला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2020 1:39 pm

Web Title: nitish kumar elected as leader of nda legislature party set to become bihar chief minister sgy 87
Next Stories
1 प्रसिद्ध बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी यांचे निधन
2 अमित शाह यांनी बोलावली तातडीची बैठक, करोना स्थितीचा घेणार आढावा
3 “अवघ्या ४० जागा असताना नितीशकुमार मुख्यमंत्री कसे होऊ शकतात?”
Just Now!
X