बिहारची राजधानी पाटणा येथे आज(रविवार) पार पडलेल्या जनता दल यूनायटेड(जदयू)च्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एक मोठा निर्णय घेतला. नितीश कुमार यांनी जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष पद माजी आयएएस व राज्यसभा सदस्य आरसीपी सिंह यांच्याकडे सोपवलं आहे. २०१६ मध्ये शरद यादव यांनी पक्ष सोडल्यापासून नितीश कुमार यांच्याकडेच राष्ट्रीय अध्यक्षपद होतं.

या बैठकीत नितीश कुमार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी आरसीपी सिंह यांच्या नावाचा प्रस्ताव मांडल्यानंतर, त्यास अन्य सदस्यांनी मान्यता दिली. त्यामुळे जेडीयूच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आरसीपी सिंह यांची निवड झाली.

रामचंद्र प्रसाद सिंह हे राज्यसभेत जदयूचे संसदीय पक्षनेते आहेत. नितीश कुमार यांनी स्वतः आपल्या पक्ष पदाधिकाऱ्यांना सांगितले होते की, त्यांच्यानंतर सर्व काही आरसीपी सिंह हेच पाहतील. एकप्रकारे नितीश कुमार यांनी आरसीपी सिंह यांना आपला राजकीय उत्तराधिकारीच बनवले आहे. तसेच, त्यांनी बिहार निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात बोलून देखील दाखवलं होतं की, ही त्यांची शेवटची निवडणूक असेल. शेवट गोड तर सर्वकाही गोड असं देखील त्यांनी म्हटलं होतं.

आरसीपी सिंह हे नितीश कुमार यांचे खास व्यक्ती समजले जातात व सदैव ते त्यांच्या बरोबर असतात. असं देखील बोललं जातं की आरसीपी यांच्याशी सल्लामसलत केल्याशिवाय नितीश कुमार कोणतेही महत्वाचे निर्णय घेत नाहीत.

बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील मुस्तफापूरमध्ये ६ जुलै १९५८ रोजी आरसीपी सिंह यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण हुसैनपूर, नालंदा आणि पाटणा विज्ञान महाविद्यालाय येथे झाले. त्यानंतर ते जेएनयूमध्ये शिक्षण घेण्यासाठी दिल्लीला गेले होते. राजकारणात येण्या अगोदर ते प्रशासकी सेवेत होते.ते उत्तर प्रदेश केडरमधून आयएएस होते. रामपूर, बाराबंकी, हमीरपूर आणि फतेहपूर येथे त्यांनी जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

आरसीपी सिंह राष्ट्रीय अध्यक्ष बनण्याअगोदर पक्षात दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून ओळखले जात. निवडणूक रणनीती निश्चित करणे, राज्यातील अधिकारशाहीवर नियंत्रण ठेवणे, सरकारसाठी धोरण ठरवणे व त्यांची अंमलबजावणी करणे, या सारख्या कामांची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. यामुळेच त्यांना जयदूचे चाणक्य देखील म्हटले जाते.