बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रविवारी आपल्या मंत्रीमंडळाचा विस्तार केला. राज्यपाल लालजी टंडन यांनी आठ नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. जनता दल युनायटेडने आपल्या कोट्यातील मंत्रीमंडळात आठ नव्या मंत्र्यांना सहभागी केलं आहे. यामध्ये मित्रपक्ष भाजपाला सहभागी केलं नाही. भाजपाच्या कोट्यातील एक पद रिकामं आहे. पण त्यानंतरही एकाही भाजपा मंत्र्याला सहभागी केलं नाही.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार मंत्रीमंडळ विस्तारावर म्हणाले की, ‘भाजपाला त्यांच्या कोट्यातील एक जागा दिली होती. पण त्यांनी ती सध्या नाकारली आहे. मंत्रीमंडळात जनता दल युनायटेच्या कोट्यातील रिक्त जागी नव्या मंत्र्यांना संधी दिली आहे. आमच्यात आणि भाजपामध्ये सर्वकाही ठीक आहे.’

नितीश कुमार यांच्या या वक्तव्यानंतर जनता दल युनायटेड आणि भाजपामध्ये वाद असलेल्या चर्चेला पुर्णविराम मिळाला असे म्हणायला हरकत नाही. कारण केंद्रामध्ये जनता दल युनायटेड सहभागी न झाल्यामुळे दोन्ही पक्षात नाराजी असल्याची चर्चा होती.

दुसरीकडे बिहार भाजपाचे अध्यक्ष सुशील मोदी यांनी मंत्रीमंडळात भाजपाचा सहभाग नसल्याबद्दलच्या चर्चेवर स्पष्टीकरण दिले आहे. सुशील मोदी ट्विट करत म्हणाले, नितीश कुमार यांनी भाजपाच्या कोट्यातील जागेवर मंत्रीपद भरण्यासाठी आमंत्रण दिलं होतं. पण, भाजपानं ही जागा भविष्यात भरण्याचा निर्णय घेतला आहे.

बिहारमधील सत्ताधारी जनता दल (युनाइटेड)नं रविवारी मंत्रीमंडळाचा विस्तार केला. आतापर्यंत मंत्रीमंडळात २५ मंत्री सहभागी होते. त्याची संख्या वाढून आता ३६ होऊ शकते. २०१७ मध्ये भाजपासोबत सत्ता स्थापण केल्यानंतर भाजपाला १४ मंत्रीपदे देण्यात आली होती. त्यामधील भाजपानं १३ जणांना मंत्रीमंडळात सहभागी केलं आहे. भाजपाच्या कोट्यातील १४ मंत्रीपदे त्यांच्याकडेच आहेत. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्याकडे एकूण पाच मंत्रीपदे आहेत.

गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार आपल्या मंत्रीमंडळाचा विस्तार करण्याचा विचार करत होते. लोकसभा निवडणूकीत नितीशकुमार यांच्या मंत्रीमंडळातील तीन जणांनी निवडणूक जिंकल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार होणार असे ग्रहीत धरले होते. अपेक्षेनुसार, रविवारी मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला. नरेंद्र नारायण यादव, अशोक चौधरी, श्याम रजक, बीमा भारती, राम सेवक सिंह, लक्षमेश्वर राय, संजय झा आणि नीरज कुमार यांना मंत्रीमंडळात सहभागी केलं आहे.