News Flash

नितीशकुमार सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री

भाजपचे तारकिशोर प्रसाद, रेणू देवी उपमुख्यमंत्री

(संग्रहित छायाचित्र)

बिहार विधानसभा निवडणुकीत २४३ पैकी १२५ जागा जिंकलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) नेते व संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीशकुमार यांनी सोमवारी बिहारचे ३७ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मागील दोन दशकात मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची ही त्यांची सातवी वेळ आहे.

राजभवनात दुपारी ४.३० वाजता झालेल्या शपथविधी सोहळ्यात बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांनी नितीशकुमार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. उपमुख्यमंत्री म्हणून भाजप नेते तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनी शपथ घेतली.

सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, बिहारचे प्रभारी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह रालोआचे राज्यातील सर्व प्रमुख नेते हजर होते.

दरम्यान, दोन दिवसापूर्वी रालोआच्या सांसदीय दलाच्या बैठकीत नेतेपदी नितीशकुमार यांची निवड झाली होती. आपल्या पक्षाला कमी जागा मिळाल्याने मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास नितीश यांनी नकार दिला होता. पण करारानुसार नितीश यांनीच हे पद स्वीकारावे, असे भाजपने सांगितले होते. त्यानंतर त्यांनी सत्तास्थापनेचा दावा राज्यपालांकडे केला होता. त्यानुसार आज शपथविधी झाला. भाजपने दोघांना उपमुख्यमंत्री करताना पक्षाचे बिहारमधील नेते सुशील मोदी यांना संधी नाकारली. त्यांच्याऐवजी पक्षातर्फे तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी या दोघांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली. तारकिशोर प्रसाद यांची रविवारी भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते आणि बेतियाहच्या आमदार रेणू देवी यांची उपनेतेपदी निवड झाली होती. त्यांनीही आज शपथ घेतली.  तारकिशोर प्रसाद वैश्य समाजातील आहेत आणि चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. आरएसएसशी संलग्न अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत प्रसाद यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. रेणू देवी मागासवर्गीयांच्या नोनिया समाजातून येतात आणि चारवेळा बेतिया मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. आज शपथ घेणाऱ्यांमध्ये भाजपचे चार, जदयुचे चार आणि दोन रालोआच्या घटक पक्षाचे सदस्य आहेत.

महाआघाडीत वादाची ठिणगी

बिहार निवडणुकीत काँग्रेसला आलेल्या अपयशाच्या मुद्यावरून महाआघाडीत वादंग माजला आहे. काँग्रेसने ७० उमेदवार उभे केले होते. त्यापैकी त्यांना फक्त १९ ठिकाणी विजय मिळाला. २०१४ च्या तुलनेतही ही संख्या कमी आहे. राहुल गांधी प्रचारासाठी तीन दिवस आले. प्रियंका गांधी आल्याच नाहीत. ही बाब योग्य नव्हती, असे राजद नेते शिवानंद तिवारी म्हणाले होते.त्यावर काँग्रेस नेते प्रेमचंद्र मिश्रा यांनी टीका केली आहे. तेजस्वी यादव यांनी तिवारी यांना लगाम लावावा. ते भाजप नेत्यांची भाषा बोलत आहेत. हे आम्ही खपवून घेणार नाही. प्रत्येक पक्षाने आघाडी धर्माचे पालन करावे, असे मिश्रा म्हणाले.

चिराग यांचा नितीशकुमार यांना टोला

लोजपाचे प्रमुख चिराग पासवान यांनी नितीशकुमार यांना शुभेच्छा देताना सोमवारी चांगलाच टोला हाणला. पासवान यांनी ट्विट करीत विद्यमान सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल व ते रालोआचेच मुख्यमंत्री म्हणून काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.  शुभेच्छा देताना कार्यकाळाचा मुद्दा उपस्थित करून चिराग यांनी नितीशकुमार यांच्या भाजपशी मैत्रीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

शपथविधी सोहळ्यावर राजद, काँग्रेसचा बहिष्कार

बिहारमधील महाआघाडीतील प्रमुख घटक पक्ष राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसने मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहोळ्यावर बहिष्कार टाकला. या निवडणुकीत जनतेने नितीशकुमार यांच्याविरोधात जनादेश दिला आहे. राजदला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. नितीशकुमार यांची मुख्यमंत्रीपदावरील निवड हा जनमताचा अवमान आहे, असा आरोप करून राष्ट्रीय जनता दलाने शपथविधी सोहोळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसनेही हीच भूमिका घेतलती आहे. दरम्यान, अत्यंत कमी फरकाने राजदने गमावलेल्या १५ जागांवरील निकालाला राजद न्यायालयात आव्हान देणार आहे. राजदने यासंदर्भात आज ट्विट केले आहे.

बिहारचे मोदी भाजपवर नाराज

भाजपचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना नव्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपदी स्थान  देण्यात आले नाही. त्यामुळे ते भाजपवर नाराज आहेत. ते पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वागतालाही गेले नाहीत. यासंदर्भात नितीशकुमार यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी हा भाजपचा निर्णय असल्याचे सांगितले.

नितीशकुमार यांची कसोटी लागणार

नितीशकुमार यांनी याआधी अनेकदा त्यांच्या भूमिका बदलल्या आहेत. कधीकाळी ते पंतप्रधान मोदींचे कडवे टीकाकार होते. मात्र त्यांच्या आमदारांची संख्या भाजपपेक्षा अधिक होती. त्यामुळे सरकारवर त्यांचा वचक होता. आता परिस्थिती बदलली आहे. भाजपच्या आमदारांची संख्या वाढल्याने नितीशकुमार यांच्याकडे सरकारचे नेतृत्व राहील, तरीही सरकारवर भाजपचे वर्चस्व असेल. अनेक महत्त्वाची खातीदेखील भाजपकडे जाऊ शकतात. त्यामुळे या सरकारचे नेतृत्व करणं नितीशकुमार यांच्यासाठी आव्हान असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 12:11 am

Web Title: nitish kumar is the chief minister of bihar for the seventh time abn 97
Next Stories
1 देशात करोनाबाधितांचा निचांक
2 काँग्रेसने पराभवाला ‘नशीब’ म्हणून स्वीकारले!
3 करोनामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन लांबणीवर?
Just Now!
X