राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस या दोघांना सोबत घेऊन बिहार निवडणुकीत भाजपला चीतपट करणारे संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार येत्या २० नोव्हेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. सर्वसाधारण निवडणुकीनंतर तिसऱ्यांदा नितीशकुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत.
दिवाळी आणि त्यानंतर बिहारमध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या छटपूजेनंतर नितीशकुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. सध्या दिवाळी सुरू आहे. त्यानंतर साधारणपणे सहा दिवसांनी छटपूजा केली जाते. त्यानंतर २० नोव्हेंबरला पाटण्यामध्ये त्यांच्यासह मंत्रिमंडळातील निवडक मंत्री पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. मंत्रिमंडळामध्ये राजद आणि संयुक्त जनता दलाचे किती मंत्री असतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार थेटपणे मंत्रिमंडळात सहभागी होणार की नाही, हे सुद्धा समजलेले नाही. गेल्या रविवारी झालेल्या मतमोजणीमध्ये महाआघाडीने बिहारमध्ये १७८ जागांवर विजय मिळवला आहे.