समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांनी आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर तिसरी आघाडी स्थापन होण्याची शक्यता वर्तवली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रातील सरकार स्थापनेत आपला पक्ष महत्त्वाची भूमिका पार पाडेल असेही त्यांनी शनिवारी सांगितले. समाजवादी पक्षाच्या सायकल रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
‘आम्ही उत्तर प्रदेश जिंकला आहे, आता दिल्ली जिंकण्याची वेळ आली आहे. समाजवादी पक्ष केंद्रातील सरकार स्थापनेत मोठी भूमिका पार पाडेल’ असे सांगून ते म्हणाले, की आम्ही एकदा केंद्रात राज्य केले पण ते सरकार विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता नव्हती त्यामुळे टिकले नाही, या वेळी तसे होणार नाही आम्ही सरकार चालवून दाखवू.
उत्तर प्रदेशात पक्षाची सायकल यात्रा सुरू करताना मुलायमसिंग यादव यांनी सांगितले, की केंद्रातील सत्ता मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आता कामाला लागावे. जर सायकलयात्रेच्या वेळी कुणी कटकारस्थाने करून तुम्हाला चिथावणी देत असेल तर फक्त हसा आणि पुढे चला. आता तुम्ही केंद्रातही सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहात याबाबत आपल्या मनात शंका नाही असे मुलायमसिंह यादव यांनी सांगितले.
“संयुक्त जनता दल पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत जाण्याची शक्यता नाही. आम्ही काँग्रेस आणि भाजपला वगळून समविचारी पक्षांची आघाडी करणार आहोत. त्यासाठी दिल्लीत ५ फेब्रुवारीला बैठक होणार आहे. डाव्या पक्षांनी या आघाडीसाठी पुढाकार घेतला आहे त्याला जनता दलाचा पाठिंबा आहे.”
-नितीशकुमार, बिहारचे मुख्यमंत्री