आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत ‘एनडीए’चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? या बद्दलचा संभ्रम बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी दूर केला आहे. बिहारचे सध्याचे मुख्यमंत्री व जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार हे राज्यात आघाडीचे सर्वोच्च कमांडर आहेत, असे त्यांनी  सांगितले आहे.

या बद्दल बोलताना उपमुख्यमंत्री सुशील मोदी म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी वारंवार हे सांगितले आहे की, नितीश कुमार हे ‘एनडीए’चे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत. युद्धाच्या मध्यात कमांडर बदलला जाऊ शकत नाही. नितीश कुमार १५-२० वर्षांपासून एनडीएचे कमांडर आहेत.

लोक जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय प्रमुख चिराग पासवान यांनी शनिवारी भाजपाला ट्विटद्वारे, बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल? असे विचारले होते. त्यावर उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

बिहार निवडणुकीत एनडीएचा चेहरा किंवा नेतृत्व कोण करेल, हा निर्णय आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला घ्यायचा आहे. बिहार व आघाडीच्या हिताच्या दृष्टिने भाजपा जो काही निर्णय घेईल, लोक जनशक्ती पार्टी पूर्णपणे त्या निर्णयाचे समर्थन करेल. असं चिराग पासवान यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे.

भाजपाने नितीश कुमार यांना बिहारमध्ये सत्तेत असलेल्या ‘एनडीए’च्या वर्षभर अगोदरपासूनच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित केले होते. मात्र महाआघाडीतील काही नेत्यांचा एक गट त्यांच्या नेतृत्वाविरोधातील आपली अदृश्य नाराजी व्यक्त करताना दिसत आहे.

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत पासवान यांनी नेतृत्व बदलाची प्रत्यक्षपणे कोणतीही मागणी केलेली नाही. मात्र भाजपा जो काही निर्णय घेईल, त्यात आम्ही त्यांच्या बरोबर राहू असं सांगितलेलं आहे. राज्यात भाजपा, जनता दल युनायटेड व लोक जनशक्ती पार्टी हे ‘राजद’ चे घटक आहेत.