संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते नितीश कुमार यांनी बुधवारी तडकाफडकी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नितीश कुमार आज संध्याकाळी राजभवानात जाऊन राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. संयुक्त जनता दलाच्या आमदारांसोबत झालेल्या बैठकीत नितीश यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला. जदयूच्या आमदारांनीही नितीश यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते लालू प्रसाद यादव आणि त्यांचे पूत्र व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर तेजस्वी यादव यांच्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा घेण्यासाठी नितीश कुमार यांच्यावरील दबाव सातत्याने वाढत होता. मात्र, तेजस्वी यादव कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देणार नाहीत, अशी भूमिका लालू प्रसाद यादव यांनी घेतली होती. आजदेखील प्रसारमाध्यमांशी बोलताना लालू प्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांचा राजीनामा मागितलाच नसल्याचे सांगितले. त्यानंतर नितीश कुमार यांनी थेट मुख्यमंत्रिपद सोडून सर्वांनाच धक्का दिला.

राज्यपालांकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी राजभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. माझ्याकडून शक्य होईल तोवर मी युतीचा धर्म पाळण्याचा प्रयत्न केला. आम्ही दीड वर्षाच्या काळात बिहारमधील जनतेच्या भल्यासाठी शक्य तितके काम केले. बिहारमध्ये सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी दारूबंदी, पायाभूत विकास आणि अनेक कल्याणकारी योजना राबवल्या. मात्र, आता परिस्थितीच अशी आली आहे की, माझ्यासाठी काम करणे किंवा आघाडीचे नेतृत्त्व करणे शक्य नाही. त्यामुळे सरकार चालवण्यात किंवा निव्वळ काम करत राहण्यात कोणताही अर्थ उरलेला नाही, असे नितीश कुमार यांनी सांगितले.

मी लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यांना भेटलो होते. तुमच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत जनतेसमोर स्पष्टीकरण द्या, असे त्यांना सांगितले होते. सामान्य जनतेमध्ये सरकारची प्रतिमा आणि विश्वास टिकून राहण्यासाठी हे गरजेचे होते. मात्र, तसे घडले नाही. त्यामुळे काम करावी अशी परिस्थिती राहिलेली नाही. काम केले तरीही चर्चा या एकाच गोष्टीवर येऊन अडते. गेल्या काही दिवसांपासून मी माझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून यातून काहीतरी मार्ग निघेल, अशी आशाही करत होतो. मात्र, तसे काही घडले नाही. उलट परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत गेली आणि मला काम करणे अवघड होत गेले. तरीही आम्ही शेवटपर्यंत युतीचा धर्म पाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता यापुढे माझी सद्सदविवेकबुद्धी मला तसे करू देणार नाही, असे नितीश यांनी सांगितले.