भाजपचा पराभव करण्याच्या उद्देशाने सर्व भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी आपण ‘मध्यस्थ’ म्हणून काम करत असल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शनिवारी सांगितले. आपण कुठल्याही पदाचे दावेदार नसलो, तरी एखाद्याच्या नशिबात पंतप्रधान होणे लिहिलेले असेल तर एक दिवस तो पंतप्रधान होईल, असे सांगून त्यांनी या मुद्दय़ावर सूचक संकेत दिले.
आपण सर्वानी भाजपविरुद्ध एकत्र व्हायला हवे, असे आवाहन नितीश कुमार यांनी जनता दल (यू)च्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत भाषण करताना केले. या बैठकीने नितीश यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झालेल्या निवडीवर शिक्कामोर्तब केले. मावळते अध्यक्ष शरद यादव यांनी नितीश यांचे नाव सुचवले आणि देशभरातून आलेल्या सुमारे एक हजार प्रतिनिधींनी या निवडीला दुजोरा दिला.
काही दिवसांपूर्वीच नितीश कुमार यांनी सर्व पक्षांना ‘संघमुक्त भारत’ करण्यासाठी एकत्र येण्याचे, तसेच २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला हद्दपार करण्यासाठी बिहारमधील प्रयोगाची राष्ट्रीय स्तरावर पुनरुक्ती करण्याचे आवाहन केले होते. यामुळे नितीश हे अशा आघाडीचे नेतृत्व करू शकतील, अशा अटकळी सुरू झाल्या होत्या.
एखाद्या व्यक्तीच्या नशिबात पंतप्रधान होण्याचे लिहिले असेल, तर तुम्ही त्याचे नाव घ्या अथवा घेऊ नका, तो पंतप्रधान होईलच.. आणि त्या व्यक्तीने स्वत:ला पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केल्यास त्याचे स्वप्न कधीच प्रत्यक्षात येत नाही, असे नितीश या वेळी म्हणाले.