बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं (एनडीए) जागा वाटप पूर्ण झाल्याचं सुत्रांकडून कळतंय. यामध्ये जनता दल युनायटेड (जेडीयू) आणि भाजपा यांच्यामध्ये ५०-५० फॉर्म्युला ठरल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, एनडीएतील घटक पक्ष असणाऱ्या लोकजनशक्ती पार्टीचं (लोपज) एनडीएत राहण्याबाबतचा संभ्रम अद्यापही कायम आहे.

या फॉर्म्युल्यानुसार, नितीशकुमार यांचा जेडीयू पक्ष एकूण २४३ जागांपैकी १२२ जागांवर निवडणूक लढवणार असून भाजपा १२१ जागांवर लढणार असल्याचे कळते. यांपैकी जेडीयू आपल्या वाट्याला आलेल्या जागांपैकी पाच ते सात जागा या जितनराम मांझी यांच्या हिंदुस्तानी आवाम पार्टीला देणार आहेत. तर भाजपा आपल्या कोट्यातून रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीला काही जागा देणार आहेत. जर रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान एनडीएत राहण्यासाठी तयार झाले तर हे जागा वाटप होणार आहे.

दरम्यान, चिराग पासवान गेल्या काही दिवसांपासून आपल्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी आग्रहीत आहेत. भाजपाकडे ४२ जागांवर ते अडून बसले आहेत. तर दुसरीकडे भाजपाने लोपजला १५ जागांचीच ऑफर दिली आहे. या संघर्षामध्ये चिराग पासवान यांनी बिहारच्या निवडणुकीत लोपज एकट्याने १४३ जागा लढवणार असल्याचे सुतोवाच केले आहे. मात्र, भाजपा आणि लोपजमधील हा तिढा अद्याप सुटलेला नाही.

जागा वाटपाबाबत जेडीयू आणि भाजपा यांच्यामध्ये पाटण्यात चर्चेची अंतिम बैठक पार पडली आहे. चार तास सुरु असलेल्या या बैठकीत जेडीयूचे टॉपचे चार पदाधिकारी यामध्ये लल्लन सिंह, आरसीपी सिंह, विजय चौधरी आणि विजेंदर यादव हे उपस्थित होते. त्यांनी भाजपाचे बिहारचे प्रभारी देवेंद्र फडणवीस आणि सरचिटणीस भूपेंद्र यादव यांची भेट घेतली.

तर दुसरीकडे राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आणि काँग्रेस यांच्या महागठबंधनमध्ये जेडीयू १४४ जागा तर काँग्रेस ७० जागा लढवणार आहे. २०१५ मध्ये जेडीयू, आरजेडी सोबत केलेल्या महागठबंधनपेक्षा काँग्रेसला यंदा जास्त जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, आरजेडीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे कनिष्ठ पुत्र तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषीत करण्यात आलं आहे.