बिहारमध्ये गुरुवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची सभा पार पाडली. यावेळी त्यांनी आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसंबंधी महत्वपूर्ण घोषणा केली. अमित शाह यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये धुसफूस होण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे. महाराष्ट्रात जे घडलं, त्यावरुन भाजपाने धडा घेतल्याचं यातून दिसत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी अंतर्गत मतभेद असल्याचा मुद्दाही त्यांनी फेटाळून लावला.

काय म्हणाले अमित शहा?
सुधारित नागरिकत्व कायद्यासह नरेंद्र मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांना बिहारच्या जनतेने पाठिंबा द्यावा असे आवाहन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी गुरुवारी केले. बिहारच्या वैशालीमध्ये त्यांची सभा पार पडली. सीएएवरुन अल्पसंख्यांकांची दिशाभूल करुन, हिंसाचाराला प्रोत्साहन देत असल्याबद्दल त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. सीएएमुळे कोणाचे नागरिकत्व काढून घेणार नसून उलट नागरिकत्व मिळणार आहे. दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला उत्तर म्हणून देशभरात सीएएच्या समर्थनार्थ रॅली आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कुठला मोठा निर्णय जाहीर केला?
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार विधानसभा निवडणूक लढवली जाईल हे अमित शाह यांनी स्पष्ट केले. नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली देशाची आणि राज्याची प्रगती सुरु असल्याचा दावा त्यांनी केला. अमित शाह यांनी जाहीर केलेल्या भूमिकामुळे जनता दल युनायटेड मोठया भावाच्या तर, भाजपा छोटया भूमिकेत राहणार हे स्पष्ट झाले आहे.