बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आजपासून सुरुवात झाली. दरम्यान, लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री आणि जदयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांच्यावर परत एकदा हल्लाबोल केला. नितीश कुमार हे पुन्हा भाजपाला धोका देतील, असं त्यांनी म्हटलं आहे.

निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नितीश कुमार भाजपाला धोका देतील आणि राजदसोबत जातील, असं विधान चिराग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या बिहार दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केलं आहे. याद्वारे त्यांनी बिहारच्या राजकारणाला एक नवा ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे.

आणखी वाचा- “मी वडिलांच्या निधनाने…”; चिराग यांनी ‘त्या’ व्हिडीओवरुन मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा

सन २०१५ मध्ये बिहारच्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या जदयूने लालू प्रसाद यादव यांच्या राजदसोबत निवडणूक लढवली होती. यामध्ये राजद सर्वात मोठा पक्ष ठरला होता. दोघांच्या गठबंधनमुळे नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले होते.

आणखी वाचा- राम मंदिराची तारीख विचारणारे आता नाईलाजानं…; पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला

त्यानंतर काही काळानंतर नितीश कुमार यांनी उपमुख्यमंत्री आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्यावरील कथीत घोटाळ्यांच्या आरोपांमुळे गठबंधनमधून बाहेर पडून भाजपासोबत सरकार स्थापन केले होते. यापार्श्वभूमीवर चिराग पासवान यांनी हे विधान केलं आहे. चिराग यांनी सातत्याने नितीश कुमार यांच्यावर हल्ला केला आहे. जदयूमुळे एनडीएतून माघार घेत ते स्वतंत्रपणे निवडणूकही लढवत आहेत.