बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. दरम्यान, एनडीएचा विजय झाल्यास नितीशकुमार मुख्यमंत्री होणार नाहीत तर भाजपाचाच मुख्यमंत्री होईल. नितीशकुमार यांना दिल्लीला पाठवले जाईल, असा दावा राष्ट्रीय लोकसमता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना सांगितले. भाजपा आणि नितीशकुमार यांच्यामध्ये याबाबत डील झाल्याचाही दावा त्यांनी केला.

आणखी वाचा- “तुमच्या आईला जाऊन विचारा…”; मुर्दाबादच्या घोषणा देणाऱ्यांना नितीश कुमार यांचा सल्ला

कुशवाहा म्हणाले, “मला वाटतं की भाजपा आणि नितीशकुमार यांच्यामध्ये डील झाली आहे. त्यानुसार नितीशकुमारही मुख्यमंत्रीपदी विराजमान न होण्याबाबत सहमत आहेत. त्यांच्या नावावर दलित, मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांकांची मत घेऊन नितीशकुमार यांना दिल्लीत सेट करुन बिहारमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री करायचं, अस त्यांच ठरल आहे. मात्र, बिहारचे लोक असं होऊ देणार नाहीत.”

आणखी वाचा- …तर नितीश कुमार गजाआड असतील – चिराग पासवान

कुशवाहा पुढे म्हणाले, “नितीशकुमार यांच्यापूर्वी लालू प्रसाद यादव यांची १५ वर्षे बिहारमध्ये सत्ता होती. या दोन्ही नेत्यांनी बिहारच्या जनतेला निराश केलं आहे. गावांमधील सरकारी शाळांमध्ये शिक्षणाची अद्यापही वानवा आहे. गरीब लोक उपचारांसाठी सरकारी रुग्णालयांमध्ये जातात. बेरोजगार लोक यापूर्वी स्थालांतर करत होते आजही करत आहेत. लोक अपमानित होत आहेत, तरीही राज्याबाहेर जात आहेत. जनतेच्या समस्येतून त्यांना अद्यापही दिलासा मिळालेला नाही.