चिराग पासवान यांचा दावा

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार रालोआतून बाहेर पडतील आणि राजदच्या नेतृत्वाखालील महाआघाडीत सहभागी होऊन २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीत रालोआसमोर आव्हान उभे करतील, असा दावा लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी रविवारी येथे केला.

राजदचे प्रमुख लालूप्रसाद यांच्याशी दीर्घकाळ संघर्ष करून नितीशकुमार सत्तेवर आले, काही वर्षांनंतर त्यांनी भाजपशी संबंध तोडले आणि आपल्या कट्टर प्रतिस्पध्र्याशी आघाडी केली. त्यानंतर नितीशकुमार यांनी पाच वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध पावले उचलली आणि त्यानंतर लालूप्रसाद यांची साथ सोडून ते दोन वर्षांतच पुन्हा रालोआमध्ये परतले, असेही चिराग पासवान म्हणाले.

नितीशकुमार पुन्हा एकदा महाआघाडीत सहभागी होतील आणि सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करतील, इतकेच नव्हे तर ते २०२४ मध्ये नरेंद्र मोदींना पर्याय म्हणून स्वत:लाच पुढे आणतील, आपले हे शब्द लक्षात ठेवा, असेही पासवान म्हणाले.