राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते तेजस्वी यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारकडे केली होती. हाच धागा पकडत तेजस्वी यादव यांनी नितीशकुमार यांना लक्ष्य केले. नितीशकुमारांनी विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासाठी संयुक्त राष्ट्र किंवा जी-8 राष्ट्राशी संपर्क साधला पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.

तेजस्वी यांनी ट्विट करत नितीशकुमारांवर टीका केली. मुख्यमंत्री कोणाकडे बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळावा म्हणून मागणी करत आहेत? त्यांनी जनतेला मुर्ख बनवण्याचे सोडून द्यावे. कारण केंद्र सरकारने यापूर्वीच त्यांची मागणी फेटाळली आहे. तुम्ही सत्तेतील आपला भागीदार भाजपाला जाब विचारा. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन दिलेले पंतप्रधानांचे व्हिडिओ बाहेर काढा, असा सल्लाही त्यांनी दिला.

यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीचा काही भागही प्रसारित केला. यामध्ये त्यांनी बिहारला विशेष राज्याचा दर्जा देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, संयुक्त जनता दलाचे मुख्य प्रवक्ते संजय सिंह यांनी तेजस्वी यांच्यावरच पलटवार केला. नितीशकुमार मुख्यमंत्री असताना घोटाळे करण्याची संधी न मिळाल्यामुळे ते असे बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला. विशेष म्हणजे २०१५ मधील बिहार विधानसभा निवडणुकीवेळी जदयू, राजद आणि काँग्रेस यांनी महाआघाडी करत सत्ता मिळवली होती. नंतर राजद आणि जदयूमध्ये वाद झाला आणि जदयूने महाआघाडीतून काढता पाय घेतला होता. त्यानंतर जदयू भाजपाच्या पाठिंब्यावर बिहारमध्ये पुन्हा सत्तेवर विराजमान झाली होती.