तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरजेडी आणि काँग्रेसची साथ सोडत भाजपची कास पकडली. भ्रष्टाचाराप्रकरणी आपण ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारल्याचे सांगत त्यांनी राजीनामा दिला आणि भाजपच्या पाठिंब्यावर लगेच सरकार स्थापन केले. पण या नव्या मंत्रिमंडळात पूर्वीच्या मंत्रिमंडळापेक्षा गुन्हे दाखल असलेल्या मंत्र्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे नितीश कुमार यांच्यावर आता विरोधी पक्षाकडून टीकेची झोड उठवली जात आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) अहवालानुसार नितीश कुमारसमवेत त्यांच्या कॅबिनेटमधील २७ पैकी २२ जणांवर गुन्हे दाखल आहेत. याउलट महाआघाडी सरकारमध्ये नितीश कुमार यांच्यासह त्या कॅबिनेटमधील २८ पैकी १९ जणांवर गुन्हे दाखल होते. म्हणजे ही संख्या कमी होती. मात्र नव्या मंत्रिमंडळात मात्र ‘डागी’ मंत्र्यांची संख्या अधिक आहे. तेजस्वी यादव हे आरजेडीचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव आहेत.

एडीआरने नितीश कुमार यांच्या कॅबिनेटमध्ये सहभागी नेत्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचे विश्लेषण करून हा अहवाल तयार केला आहे. नितीश कुमार यांच्या सध्याच्या मंत्रिमंडळात २२ मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत. यातील ९ जणांवर गंभीर गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात येते. या नेत्यांनीच आपल्या प्रतिज्ञापत्रात याचा उल्लेख केला आहे.

नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील ९ मंत्र्यांचे शिक्षण हे आठवी ते १२ यादरम्यान झाले आहे. तर १८ जणांकडून पदवी किंवा त्याहून अधिक शैक्षणिक पात्रता आहे. नितीश यांच्या मागील कॅबिनेटमध्ये दोन महिला मंत्री होत्या. तर सध्याच्या मंत्रिमंडळात फक्त एकच महिला मंत्री आहे.

दरम्यान नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील कोट्यधीश मंत्र्यांची संख्या कमी झाली आहे. नितीश यांच्या मागील मंत्रिमंडळात २२ कोट्यधीश मंत्री होते. विद्यमान मंत्रिमंडळात ती संख्या एकने कमी होऊन २१ इतकी झाली आहे. नितीश यांच्या कॅबिनेटची सरासरी संपत्ती २.४६ कोटी रूपये इतकी आहे. नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात भाजपचे सुशील मोदी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नितीश यांच्या मंत्रिमंडळात १४ जेडीयू, १२ भाजप आणि लोसपाच्या एकाला स्थान देण्यात आले आहे.

नितीश कुमार यांनी मागील आठवड्यात अत्यंत नाट्यमयरित्या आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत भाजपच्या पाठिंब्यावर सरकार स्थापले होते. त्यांनी विश्वासदर्शक ठरावही जिंकला होता.