भाजप आणि संयुक्त जनता दलाच्या डीएनएमध्येच संधीसाधूपणा असून या दोन्ही पक्षांनी मिळून बिहारमध्ये जनतेचा विश्वासघात केला अशी टीका काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली. नितीशकुमार यांना फक्त सत्तेची भूक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बिहारमध्ये संयुक्त जनता दलाचे नितीशकुमार यांनी बुधवारी राजकीय भूकंप घडवत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र रात्री भाजपचा पाठिंबा मिळवत नितीशकुमार यांनी सत्तास्थापनेसाठी दावा केला. गुरुवारी नितीशकुमार यांचा शपथविधी सोहळाही पार पडला. यात भाजपचे सुशीलकुमार मोदी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि जदयूवर हल्लाबोल केला. बिहारमध्ये भाजप आणि जदयूने जनतेचा विश्वासघात केला असून प्रामाणिकपणाचा बुरखा फाटल्याची टीका सुरजेवाला यांनी केली. बिहारमधील मुझफ्फरपूर येथे जुलै २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नितीशकुमार यांच्या राजकीय डीएनएवर प्रश्न उपस्थित केले होते. पण आज भाजप आणि जदयू या दोन्ही पक्षांच्या राजकीय डीएनएमध्ये फक्त संधीसाधूपणा, विश्वासघात आणि सत्तेची भूक असल्याची विखारी टीका रणदीप सुरजेवाला यांनी केली.

नोव्हेंबर २०१५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बिहारमधील जनतेने भाजप आणि नरेंद्र मोदींच्या धोरणांना नाकारले होते. जनतेने महाआघाडीच्या बाजूने कौल दिला होता. नितीशकुमार यांच्या पक्षाने कमी जागा जिंकल्या होत्या. मात्र त्यानंतरही महाआघाडीने एकमताने नितीशकुमार यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली होती अशी आठवण सुरजेवाला यांनी करुन दिली.

गेल्या २० महिन्यात बिहारमध्ये पुन्हा एकदा ‘आया राम- गयार रामां’चे राजकारण सुरु झाले आहे. जनतेने नाकारलेला भाजप आणि सत्तेची भूक असलेल्या नितीशकुमार यांनी एकत्र येऊन सत्तास्थापन केली. भाजप- जदयू सरकार चालवण्यास अपात्र असून त्यांच्याकडे जनमताचा आधार नाही असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. गोवा आणि मणिपूरमध्येही भाजपने जनमताचा अनादर करत सत्ता स्थापन केली. राजकारण आणि लोकशाहीतील तत्त्वांची उघडपणे हत्या करण्यात आली असून हा लोकशाहीतील काळा दिवस असल्याचे सुरजेवालांनी म्हटले आहे. काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रीय जनता दलाने भाजप-जदयूला इशारा दिला आहे. नितीशकुमारांनी राजीनामा दिला नाही तर विधीमंडळाचे कामकाज चालू देणार नाही असा इशाराच राजदने दिला आहे.