अरुणाचल प्रदेशमध्ये नॅशनल पीपल्स पार्टीचे खोंसा पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार तिरोंग अबो व अन्य सहा जणांचा एका हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात अबो यांच्या कुटूंबीयांसह सुरक्षारक्षकांचा देखील मृत्यू झाला आहे.

माध्यमांच्या माहितीप्रमाणे संशयीत हल्लेखोर हे नॅशनल सोशलिस्ट काैन्सिल ऑफ नागालॅण्ड (एनएससीएन) या संघटनेचे दहशतवादी असू शकतात. ही घटना अरूणाचल प्रदेशातील तिरप जिल्ह्यातील बोगापानी गावात घडली.

मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त करत म्हटले आहे की, आमदार अबो व त्यांच्या कुटूंबीयांच्या मृत्यूच्या बातमीने एनपीपी स्तब्ध आणि अतिशय दुखी आहे. आम्ही या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. तसेच, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि पंतप्रधान मोदी यांच्याकडे दोषींविरोधात कठोर कारवाई केली जावी अशी मागणी करत आहोत.