पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात कुठल्याही भावना नाहीत. त्यांच्यामध्ये कुठलीही आग नाही असा आरोप पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी केला आहे. ते इंडिया टुडेशी बोलत होते. पंतप्रधान इम्रान खान यांचे समर्थन करताना पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो हा भारताचा आरोप त्यांनी फेटाळून लावला.

पूलवामाचा दहशतवादी हल्ला खूप भयानक होता. पण म्हणून त्यात पाकिस्तान सरकार सहभागी आहे असे म्हणता येणार नाही. पूलावामाची घटना खूप भीषण आणि दु:खद आहे. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरबद्दल मला कुठलीही सहानुभूती नाही. त्याने मला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला होता. पण म्हणून पाकिस्तान सरकार पुलवामाच्या हल्ल्यामध्ये सहभागी आहे असा त्याचा अर्थ होत नाही असे मुशर्रफ म्हणाले.

इम्रान खानलाही जैशबद्दल कुठलीही सहानुभूती नसेल असे मला वाटते असे मुशर्रफ म्हणाले. पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मदच्या आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्यावर धडकवली. या घटनेत भारताचे ४० जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर संपूर्ण भारतातून पाकिस्तानला अद्दल घडवण्याची बदला घेण्याची मागणी होत आहे. हल्ल्याच्या दुसऱ्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामाच्या हल्लेखोरांना किंमत चुकवावी लागेल असा इशारा दिला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताने हल्ला केल्यास आम्ही प्रत्युत्तर देऊ असे म्हटले आहे.