News Flash

मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप नाही, मग होणार गुन्हा दाखल

नोएडा पोलिसांनी काढले आदेश

संग्रहित छायाचित्र.

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि करोना संबंधित माहितीसाठी केंद्र सरकारनं आरोग्य सेतू अॅप विकसित केलं आहे. या अॅपचा वापर करण्याचं आवाहनं केंद्र सरकारच्या वतीनं वारंवार केलं जात असून, नोएडा पोलिसांनी आरोग्य सेतू अॅप अनिवार्य केलं आहे. नोएडा आणि ग्रेटर नोएडा परिसरात राहणाऱ्या नागरिकांकडे आरोग्य सेतू अॅप नसल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आदेशच पोलिसांनी काढले आहेत.

करोनाविषयीच्या माहितीत सूसुत्रता आणण्यासाठी त्याचबरोबर संसर्ग झालेल्या रुग्णांची माहिती ठेवण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आरोग्य सेतू अॅप तयार केलं. हे अॅप देशभरात वापरलं जात आहे. तर अनेक जणांकडे हे अॅप नाही. दरम्यान, नोएडा पोलिसांनी आरोग्य सेतू अॅप मोबाईलमध्ये ठेवण्याची सक्ती केली आहे. “ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे, पण आरोग्य सेतू अॅप नाही, अशा नागरिकांविरुद्ध पोलीस कलम १८८ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा दंडाधिकारी त्या व्यक्तीला शिक्षा द्यायची, दंड ठोठवायचा की, सोडून द्यायचं हे ठरवतील,” असं नोएडाचं कायदा आणि सुव्यवस्था पोलीस उपायुक्त अखिलेश कुमार यांनी सांगितलं.

“पकडल्यानंतर लोकांनी जर हे अॅप लगेच डाउनलोड केलं, तर त्यांना कोणतीही कारवाई न करता सोडण्यात येईल. लोकांनी आदेश गांभीर्यानं घेऊन अॅप डाउनलोड करावं म्हणून पोलीस हे काम करत आहे. पण, वारंवार इशारा देऊनही जर अॅप डाउनलोड केलं नाही, पोलीस त्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करतील,” असं कुमार म्हणाले.

पकडल्यानंतर अॅप डाउनलोड करण्यासाठी त्या व्यक्तीकडे इंटरनेटच नसेल तर काय? या प्रश्नावर बोलताना अखिलेश कुमार म्हणाले, “पकडल्यानंतर हे अॅप डाउनलोड करण्यासाठी व्यक्तीकडे इंटरनेट शिल्लक नसेल, तर पोलीस हॉटस्पॉटद्वारे ही सुविधा पुरवतील. पण, जर मोबाईलमध्ये स्टोरेज नसेल, तर मग त्या व्यक्तीचा नंबर घेतला जाईल. त्यानंतर त्या व्यक्तीनं अॅप डाउनलोड केलं की नाही, याचा पाठपुरावा केला जाईल,” असंही कुमार यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2020 1:18 pm

Web Title: no aarogya setu app pay rs 1000 fine or face 6 months jail in noida bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 कर्नाटक सरकारने रद्द केल्या मजुरांसाठीच्या विशेष ट्रेन; ‘अर्थव्यवस्थेसाठी मजुरांची गरज’ असल्याचं दिलं कारण
2 Lockdown 3 नंतर काय करणार मोदी सरकार?-सोनिया गांधी
3 अवघी ३५ वर्षांची अर्थमंत्री; पण आहे करोना लढ्यातील रॉकस्टार
Just Now!
X