जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने ( जेएनयू) १९ सप्टेंबरपर्यंत कन्हैया कुमारविरोधात कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. विद्यापीठाने कन्हैयावर दंडात्मक किंवा अन्य कोणतीही कारवाई करू नये, असे आदेशात म्हटले आहे. यापूर्वी सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयाकडून कन्हैया कुमारसह उमर खालीद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांच्यासंदर्भातील कारवाईच्या आदेशांना स्थगिती देण्यात आली होती. ९ फेब्रुवारी रोजी जेएनयूच्या आवारात वादग्रस्त घोषणा दिल्याप्रकरणी शिस्तभंगाचा आरोप होता. त्यानंतर विद्यापीठाकडून संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले होते. उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांनी या आदेशांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
२००१ मधील संसद भवन हल्ल्यातील फाशी दिलेला दहशतवादी अफजल गुरू याच्या पाठिंब्यासाठी विद्यार्थ्यांनी जेएनयूमध्ये कार्यक्रम घेऊन घोषणाबाजी केली होती. या प्रकरणी कन्हैया कुमारबरोबरच इतरांवर कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणावरून देशातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 6, 2016 4:37 pm