लोकसभा निवडणुका जवळ येताच सगळ्या पक्षांची मोट बांधण्याची तयारी काँग्रेसने सुरु केली आहे. भाजपाला टक्कर देण्यासाठी ही काँग्रेसची रणनीती आहे. अशात समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी मात्र काँग्रेससोबत आघाडी करण्यास नकार दिला आहे. काँग्रेस हा अहंकारी पक्ष आहे त्यांच्यासोबत आघाडी करण्याचा प्रश्नच येत नाही असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. News 18 या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी काँग्रेससोबत हातमिळवणी करणार नसल्याचे म्हटले आहे.

काँग्रेस हा असा पक्ष आहे ज्या पक्षाने काही चांगली कामे केली आहेत. त्याबद्दल माझ्या मनात काहीही शंका नाही. मात्र लोकशाहीत आमचाच पक्ष मोठा आहे अशी काँग्रेसची धारणा आहे. ते आम्हाला किंमत देत नाहीत कारण काँग्रेस हा अहंकारी लोकांचा पक्ष आहे. त्यांना हे वाटतं की त्यांच्याशिवाय आमचे पानही हलणार नाही. मात्र तशी परिस्थिती नाही. सध्या देशाला तिसऱ्या पर्यायाची गरज आहे. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या ठिकाणी जागावाटपावर काँग्रेस आणि सपा यांच्यात सहमती झाली नाही. ज्यानंतर अखिलेश यादव यांनी या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

भाजपावरही अखिलेश यादव यांनी निशाणा साधला आहे. भाजपाला पराभवाची धूळ कोणताही पक्ष नाही तर जनताच चारेल असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. भाजपावर शेतकरी नाराज आहेत, युवक आणि तरुण वर्ग नाराज आहे. काँग्रेसनेही शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करू नये. मध्ये प्रदेशात ४२ वर्षात काय केलं ते आधी सांगावं असाही प्रश्न अखिलेश यादव यांनी उपस्थित केला.

उत्तर प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि सपा यांनी एकत्र येऊन लढली होती. मात्र भाजपाला त्याने काहीही फरक पडला नाही. आता तर २०१९ ला काँग्रेसशी हात मिळवणी करण्याचा प्रश्नच येत नाही असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेसकडून अखिलेश यादव यांचे मन वळवण्यासाठी काही प्रयत्न केले जातील का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.