घटना इतिहासाला कलंक असल्याची थेरेसा मे यांची भावना

लंडन : जालियनवाला बाग हत्याकांड हे ब्रिटिश आमदानीतील भारताच्या इतिहासाला लागलेला एक लाजिरवाणा कलंक असल्याची भावना ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी बुधवारी व्यक्त केली. या क्रूर, अमानवीय घटनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी ही खेदाची भावना व्यक्त केली असली, तरी या घटनेबद्दल औपचारिक क्षमा मागण्याचे मात्र त्यांनी टाळले.

ब्रिटिश संसदेच्या प्रतिनिधीगृहात पंतप्रधानांच्या साप्ताहिक प्रश्नोत्तरांच्या आरंभी मे यांनी जालियनवाला बाग गोळीबाराबद्दल आपली भावना व्यक्त केली. याच सभागृहात यापूर्वी झालेल्या चर्चेत उभय बाजूच्या सदस्यांनी जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणी ब्रिटिश सरकारने औपचारिक माफी मागावी, अशी सूचना केली होती.

याप्रकरणी ब्रिटिश सरकारने याआधीच ‘खेद’ व्यक्त केलेला आहे, याचा पुनरुच्चार पंतप्रधान मे यांनी केला.

आपल्या निवेदनात मे म्हणाल्या की, ‘भारतामध्ये ब्रिटिश कालखंडात १९१९ मध्ये घडलेले जालियनवाला बाग प्रकरण हे इतिहासातला एक लाजिरवाणा कलंक आहे. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ दुसऱ्या यांनी १९९७ मध्ये या ठिकाणी भेट देण्याआधी म्हटल्याप्रमाणे हे भारतातील आपल्या गत इतिहासातले एक अत्यंत वेदनादायक प्रकरण आहे.’

एप्रिल-१९१९ मध्ये अमृतसरमधील जालियनवाला बागेत बैसाखीच्या दिवशी स्वातंत्र्याच्या मागणीसाठी हजारो लोक जमले होते. या निदर्शकांवर जनरल डायर याच्या आदेशानुसार ब्रिटिश सैनिकांनी बेछुट गोळीबार केला. यात हजारो भारतीय शहीद झाले.