आत्महत्या करण्याऐवजी पोलिसाची हत्या करण्यासाठी एका सहकारी कार्यकर्त्यांला प्रवृत्त केल्याबद्दल देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या पटेल समाज आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याचा जामीन अर्ज येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावला.
पटेल समाजाला ओबीसी संवर्गात आरक्षण मिळावे यासाठी राज्यव्यापी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या २२ वर्षांच्या हार्दिकचा जामीन अर्ज प्रधान जिल्हा न्यायाधीश गीता गोपी यांनी फेटाळला.
सुरत व अहमदाबाद येथे मिळून देशद्रोहाचे दोन गुन्हे हार्दकिवर दाखल करण्यात आले आहेत. सध्या लाजपूर तुरुंगात कैद असलेल्या हार्दिकने, आपल्यावर खोटय़ा आरोपांखाली खटला भरण्यात आला असून केवळ बोललेल्या शब्दांमुळे देशद्रोह होत नाही असा दावा करत सत्र न्यायालयात जामीन अर्ज केला होता. राज्यात अलीकडेच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून आपल्याला दूर ठेवण्यासाठी राज्य सरकारने जाणूनबुजून आपल्यावर खोटेनाटे आरोप लावल्याचे त्याचे म्हणणे होते.