News Flash

दिवाळीत आतषबाजी कायम; फटाके विक्रीला सुप्रीम कोर्टाची सशर्त परवानगी

दिवाळीच्या रात्री १० वाजेपर्यंतच फटाके फोडता येणार आहेत. तर नाताळ आणि नवीन वर्षाला रात्री ११.४५ ते मध्यरात्री १२.३० पर्यंत अर्थात पाऊण तास फटाके फोडता येतील.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांच्या विक्रीला सुप्रीम कोर्टाने मंगळवारी सशर्त परवानगी दिली. त्यामुळे नागिरकांना नेहमीप्रमाणे फटाक्यांसह दिवाळी आनंदाने साजरी करता येणार आहे. दरम्यान, फटाक्यांची ऑनलाइन विक्री करता येणार नाही, असे कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे ई-कॉमर्स साइट्सवरुन फटाके विक्रीला स्थगिती देण्यात आली आहे. फटाके विक्रीबाबत अंशतः घातलेली बंदी ही देशभरात लागू असून पर्यावरण रक्षणासाठी या आदेशांचे नागरिकांनी पालन करावे असे न्या. ए. के. सिक्री आणि न्या. अशोक भुषण यांनी निर्णय देताना म्हटले आहे.

सुप्रीम कोर्टाने देशभरात सरसकट फटाके विक्रीच्या बंदीला नकार दिला असला तरी कमी प्रदुषण करणाऱ्या फटाक्यांचीच विक्री केली जावी असे आपल्या आदेशात म्हटले आहे. त्याचबरोबर फटाक्यांची ऑनलाइन विक्री करण्यावरही कोर्टाने बंदी घातली आहे. त्यामुळे अॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांना फटाके विक्री करता येणार नाही.

त्याचबरोबर, दिवाळीच्या रात्री १० वाजेपर्यंतच फटाके फोडता येणार आहेत. तर, नाताळ आणि नवीन वर्षाला रात्री ११.४५ ते मध्यरात्री १२.३० पर्यंत अर्थात पाऊण तासच फटाके फोडता येतील, असे कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे. मोठे फटाके आणि फटाक्यांच्या माळांवरही सुप्रीम कोर्टाने बंदी घातली आहे. तसेच विशिष्ट सुरक्षित ठिकाणीच आणि ठरवून दिलेल्या वेळेतच फटाके उडवावेत असेही कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, केंद्रीय प्रदुषण नियंत्रण बोर्डाचे वकिल विजय पंजवाणी म्हणाले, फटाके विक्रीबाबत पूर्णपणे बंदीचे आदेश येतील अशी आम्हाला आशा होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने याबाबत कठोर निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे फटाक्यांना परवानगी देण्यात आली तरी त्यासाठी वेळेचे बंधनही कोर्टाने घातले आहे. रात्री ८ ते १० वाजेपर्यंतच फटाके उडवता येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2018 10:57 am

Web Title: no ban on sale of firecrackers but with certain conditions says supreme court
Next Stories
1 CBI War : उपसंचालक राकेश अस्थानांची घर वापसीची शक्यता
2 पोलीस कर्मचाऱ्याने गोळी घातलेल्या न्यायाधीशाच्या मुलाचा मृत्यू, अवयवदान करण्याचा निर्णय
3 पाकिस्तानचे 100 दहशतवादी भारतावर आत्मघाती हल्ला करण्याच्या तयारीत
Just Now!
X