कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेऊन देशाबाहेर पसार झालेल्या किंगफिशर उद्योगसमुहाचे मालक विजय मल्ल्या यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच भाष्य केले. बँकांची थकबाकी ठेवून परदेशात पसार झालेल्यांना परत आणून त्यांच्याकडून कर्जाची वसुली करणारच, असे नरेंद्र मोदी विजय मल्ल्यांचे नाव न घेता म्हणाले. ते आसाममधील रंगापाडा येथील एका प्रचारसभेत बोलत होते.

मोदी म्हणाले की, श्रीमंतांनी बँकांकडून कर्जरुपाने घेतलेले पैसे त्यांना परत करायला लावू, बँकांची थकबाकी ठेवून देणार नाही. देशातील बँकांची परिस्थिती बिघडण्यास काँग्रेस सरकार जबाबदार असून, त्यांच्याच कार्यकाळत धनाढ्य उद्योगपतींना कर्जरुपात पैसा वाटला गेला. पण आता श्रीमंतांना बँकाना लुटू देणार नाही.

दरम्यान, दलालांचे जाळे नष्ट करून २०२२ सालापर्यंत प्रत्येकाला घर मिळवून देणे ही सरकारची उद्दीष्ट्ये असल्याचेही पंतप्रधान यावेळी म्हणाले. आसाममध्ये केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रकल्पांचीही माहितीत त्यांनी दिली.