भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली येत्या काही दिवसांत भाजपावासी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. सोमवारी दुपारी सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल गेला. बीसीसीआयवर सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या अनुराग ठाकूर आणि एन.श्रीनीवासन या गटात झालेल्या तडजोडीनंतर सौरव गांगुली बीसीसीआयचा बिनविरोध अध्यक्ष होण्याची चिन्ह आहेत. अनुराग ठाकूर गटाने सौरव गांगुलीना अध्यक्षपदासाठी आपला पाठींबा दर्शवला आहे. ज्यावरुन आगामी काळात सौरव गांगुली भाजपाकडून राजकारणाच्या मैदानात उतरणार का? अशा चर्चांना सुरुवात झाली होती. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहा यांनी या प्रश्नावर, सौरव गांगुलीचं भाजपात स्वागत आहे असं म्हणत सूचक संकेत दिले आहेत.

India Today वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शाहा यांनी या प्रश्नावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. अमित शाहा यांचे पुत्र जय शाहा यांची बीसीसीआयच्या सचिवपदी नियुक्ती होण्याची चिन्ह आहेत. मात्र यासाठी कोणत्याही प्रकारचा सौदा झाला नसल्याचं शाहा यांनी स्पष्ट केलं. “बीसीसीआयचा अध्यक्ष कोण होणार हे माझ्या हातात नाही. यासाठी बीसीसीआयची वेगळी निवडणूक प्रक्रिया आहे. सौरव गांगुली मला कधीही भेटू शकतो, अनेक खेळाडूंशी माझे चांगले संबंध आहेत.”

बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या बदल्यात आगामी बंगाल निवडणुकांसाठी सौरव गांगुलीला भाजपाचा चेहरा म्हणून उतरवण्यात येणार असल्याची चर्चा होती. ज्यावर बोलताना शाहा म्हणाले, “अशाप्रकारे कोणतीही चर्चा सौरव गांगुलीसोबत झालेली नाही. सौरवबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. या विषयावर सौरवसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. कोणत्याही प्रमुख चेहऱ्याच्याशिवाय आम्ही बंगालमध्ये १८ जागा जिंकलो आहोत. याचा अर्थ आम्हाला बंगालमध्ये चेहऱ्याची गरज नाहीये असा होत नाही. मात्र भविष्यकाळात सौरव गांगुलीने जर भाजपात येण्याचा निर्णय घेतला तर त्याचं स्वागतच असेल.”

२३ ऑक्टोबर रोजी बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपद आणि इतर जागांसाठी अंतिम घोषणा होईल. सध्याची परिस्थिती पाहता सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होणं निश्चीत मानलं जात आहे. मात्र अमित शाहा यांनी दिलेल्या संकेतांमुळे आगामी काळात कोलकात्याचा प्रिन्स राजकारणाच्या फडात दिसणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.