विश्वाच्या निर्मितीवेळी महाविस्फोट झाल्याचा सिद्धांत खरा नाही तसे काही झालेच नव्हते, विश्वाला सुरुवात व अंतच नाही असे काही भौतिकशास्त्रज्ञांनी म्हटले असून त्यात भारतीय वंशाच्या एका वैज्ञानिकाचा समावेश आहे. महाविस्फोट सिद्धांताला छेद देणारा हा नवीन सिद्धांत कृष्णद्रव्य व कृष्णऊर्जा यांचा विचार करून यात पुंज भौतिकीचे नियम लावून या सिद्धांताची तपासणी करण्यात आली आहे.
 विश्वाची उत्पत्ती १३.८ अब्ज वर्षांपूर्वी झाली व त्यावेळी एका एकल बिंदूत सगळे सामावलेले होते. महाविस्फोटानंतर विश्वाची निर्मिती सुरू झाली. महाविस्फोट सिद्धांताप्रमाणे एकलबिंदूतून विश्वाची निर्मिती सुरू झाली असे मानले तरी आधी व नंतर काय घडले याचे स्पष्टीकरण फक्त गणिताच्या माध्यमातून करता येते. ईजिप्तच्या बेनहा विद्यापीठाचे अहमद फराग अली व कॅनडातील लेथब्रिज विद्यापीठाचे सौर्या दास यांनी म्हटले आहे की, महाविस्फोट एकलतेचे कोडे आम्ही नवीन प्रारूपानुसार सोडवण्याचा प्रयत्न केला असून त्यात विश्वाला सुरुवात व शेवट नाही. त्यांचे संशोधन जर्नल फिजीक्स लेटर बी मध्ये प्रसिद्ध झाले असून ते सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ डेव्हिड बोहम यांच्या  संकल्पनेवर आधारित आहे. बोहम यांनी १९५० मध्ये क्लासिकल जिओडेसिकला ( वक्राकार पृष्ठभागावरील दोन बिंदूतील सर्वात कमी अंतर) क्वांटम ट्रॅजेक्टरीजचा पर्याय दिला होता. बोहमयिन ट्रॅजेक्टरीजचा वापर संशोधकांनी कोलकाता येथील प्रेसिडेन्सी विद्यापीठाचे वैज्ञानिक अमल कुमार यांनी १९५० मध्ये शोधलेल्या समीकरणात केला.
नव्या प्रारूपात महाविस्फोट एकलतेचे भाकित केले जात नाही. क्लासिकल जिओडेसिक्स व बोहोमियन ट्रॅजेक्टरीज यात फरक असून त्यामुळेच एकलेताचा मुद्दा त्यात टाळला आहे. क्वांटम दुरुस्त्यानुसार वैश्विक स्थिरांक व रेडिएशन हे दोन घटक असू शकतात. त्यामुळे विश्वाचा आकार सीमित होत असला तरी त्याचे वय मात्र अनंत असू शकते.