यापुढे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुष्पगुच्छ देऊ नयेत, असे निर्देश सोमवारी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आले. गृह मंत्रालयाकडून देशातील सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबत कळवण्यात आले आहे. एखाद्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी काही द्यायचेच असेल तर जास्तीत एखादे फूल, हातरूमाल किंवा पुस्तक द्यावे, असे गृह मंत्रालयाने सांगितले आहे. देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी या सूचनेची दखल घ्यावी, असे गृह मंत्रालयाच्या आदेशात म्हटले आहे.

यापूर्वी १७ जून रोजी नरेंद्र मोदी यांनी जाहीर कार्यक्रमातही आपल्याला भेट म्हणून पुस्तके द्यावीत, असे आवाहन केले होते. वाचन आणि ज्ञान या गोष्टी केवळ तुमच्या कार्यक्षेत्रापुरत्या मर्यादित नसतात. त्यामुळे सामाजिक जबाबदारी, देशाप्रतीचा आणि मानवतेप्रतीचा सेवाभाव याबद्दल भान येते. वाचनामुळे समाजातील वाईट गोष्टींचा नाश होऊ शकतो. तसेच यामुळे शांततेचा प्रसार होऊन देशाचे ऐक्य आणि अखंडता वाढण्यात मदत होते. वाचनामुळे आयुष्यात आमुलाग्र आणि निर्णायक बदल घडू शकतात, असे मोदींनी म्हटले होते.

लवकरच पंतप्रधान मोदी यांचे पुस्तक बाजारात येणार आहे. परीक्षांच्या ताणावर मात कशी करावी, परीक्षेनंतर काय करावे याचे मार्गदर्शन त्यात केले जाणार आहे. ‘पेंग्विन रँडम हाऊस इंडिया’ हे पुस्तक प्रकाशित करणार असून ते विविध भाषांत उपलब्ध होईल. दहावी, बारावीशी संबंधित अनेक प्रश्नांवर त्यात मार्गदर्शन असेल. पंतप्रधान या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मित्र बनतील. गुणांपेक्षा ज्ञान कसे महत्वाचे आहे व भविष्यात जबाबदारी कशी पार पाडावी यावर अनौपचारिक व संभाषणात्मक भाषेत हे पुस्तक असेल. मोदी यांनीच पुस्तकाची संकल्पना मांडली असून, ती ‘मन की बात’ कार्यक्रमाला मिळालेल्या प्रतिसादातून आलेली आहे. यात पंतप्रधान त्यांचे विचार पुस्तक रूपात मांडणार आहेत.

माझ्या आवडीच्या विषयावर लिहिणार असून यात उद्याच्या युवकांना मार्गदर्शन करण्याचा हेतू आहे, असे मोदी यांनी सांगितल्याचे प्रकाशन कंपनीने म्हटले आहे. यात ब्लू क्राफ्ट डिजिटल फाऊंडेशन ही ‘ना नफा कंपनी’ यात टेक्नॉलॉजी व नॉलेज पार्टनर आहे. मोदी यांचा संदेश पुस्तक रूपाने युवकांपर्यंत पोहोचवण्यात आनंदच आहे, असे पेंग्विन रँडम हाऊस इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव श्रीगणेश यांनी सांगितले. मुख्य संपादक मिली ऐश्वर्या यांनी सांगितले की, हे वेगळे पुस्तक असून ते पंतप्रधानांनी युवक व विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेले असेल.