लखनौ : सर्वोच्च न्यायालयाने ७ मे रोजी उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांना अधिकृत निवासस्थाने सोडण्याचा आदेश दिल्यानंतर आता त्यांनी बंगले सोडण्याची तयारी सुरू केली आहे. मालमत्ता विभागाने माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी, मुलायम सिंह यादव, कल्याण सिंह, मायवती, राजनाथ सिंह, अखिलेश यादव यांना त्यांचे बंगले रिकामे करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी व बसपा प्रमुख मायावती वगळता इतर चार माजी मुख्यमंत्र्यांनी बंगले सोडण्याची तयारी सुरू केली आहे. नारायण दत्त तिवारी आजारी असून त्यांच्या पत्नी उज्ज्वला तिवारी यांनी बंगला रिकामा करण्यास आणखी वेळ मागितला आहे. मायावती यांनी १३ ए मॉल अ‍ॅव्हेन्यू हा बंगला पक्ष संस्थापक काशीराम यांचे स्मारक असल्याचा दावा केला आहे. मालमत्ता विभागाने त्यांचा दावा फेटाळला असून लालबहादूर शास्त्री मार्ग निवासस्थान त्यांनी बेकायदेशीर रीत्या बळकावले होते, ते त्यांनी सोडले आहे. १३ ए मॉल अ‍ॅव्हेन्यू निवासस्थान मायावती यांना मुख्यमंत्री म्हणून देण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी ते रिकामे करावे असे नोटिशीत म्हटले आहे. मायवती यांनी गेल्या आठवडय़ातच असा दावा केला होता, की न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांनी ६ लालबहादूर शास्त्री मार्ग हे निवासस्थान सोडले आहे. बसपाने असा दावा केला, की ते निवासस्थान मायावतींना माजी मुख्यमंत्री म्हणून दिले आहे. मायावतींना चुकीच्या बंगल्यासाठी नोटीस दिली आहे असा दावा बसपाने केला आहे. गेल्या आठवडय़ात बसपा शिष्टमंडळाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन मॉल अ‍ॅव्हेन्यू बंगला हा काशीराम यांचे स्मारक असून त्यातील दोन खोल्या मायावती यांच्याकडे आहेत असे म्हटले होते. नारायण दत्त तिवारी यांनी  बंगला सोडायला लागू नये म्हणून पंडित नारायण दत्त तिवारी सर्वजन विकास फाउंडेशन अशी पाटी दारावर लावली आहे. बंगले सोडण्यासाठीची मुदत एक दिवसाने संपणार असताना तिवारी यांनी मालमत्ता विभागाला काही कळवलेले नाही. ४ व ५ विक्रमादित्य मार्गावरील निवासस्थाने रिकामी करण्यास अखिलेश यादव व मुलायम सिंह यादव यांनी सुरुवात केली आहे. कल्याण सिंह व राजनाथ सिंह हे बंगले रिकामे करणार आहेत असे सांगण्यात आले.