राफ्टिंग सुरू ठेवण्यास मात्र परवानगी
नियमावली लागू होईपर्यंत गंगेच्या काठावर असलेल्या उत्तराखंडमधील कौडियाला ते हृषीकेश या संपूर्ण पट्टय़ात शिबिरे आयोजित करण्यास (कँपिंग) राष्ट्रीय हरित लवादाने गुरुवारी बंदी घातली, तथापि ‘राफ्टिंग’ हा साहसी खेळ सुरू ठेवण्यास मात्र परवानगी दिली.
३१ मार्च २०१५ रोजी लवादासमोर केलेल्या निवेदनाचे पालन करून सरकारने या संदर्भातील निर्णय अमलात येईपर्यंत कौडियाला ते हृषीकेश या पट्टय़ात शिबिरे भरवू देऊ नये. मात्र, राफ्टिंगमुळे नदीचे किंवा पर्यावरणाचे गंभीर प्रकारचे प्रदूषण होत नसल्यामुळे हा खेळ तात्काळ सुरू करण्याची आम्ही परवानगी देत आहोत, असे लवादाचे अध्यक्ष स्वतंत्र कुमार यांनी सांगितले.
गंगा नदीच्या काठावर हृषीकेश आणि इतर भागांमध्ये ‘कुठल्याही नियमाशिवाय’ सुरू असलेल्या राफ्टिंग शिबिरांविरुद्ध ‘सोशल अ‍ॅक्शन फॉर फॉरेस्ट अँड एन्व्हायर्नमेंट’ (सेफ) या स्वयंसेवी संघटनेने केलेल्या याचिकेवर लवादाने हा आदेश दिला.
लवादाने केंद्र व उत्तराखंड सरकारच्या विविध विभागांमधील अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आणि या संदर्भात एक नियमावली तयार करून ती तीन आठवडय़ांत लवादापुढे सादर करण्यास
सांगितले.