राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह विरोधकांकडून ईव्हीएम मशिन सदोष असल्याचा आरोप करत पुन्हा बॅलेट बॉक्स आणण्याची मागणी केली जात आहे. मात्र, ईव्हीएमच्या जागी परत बॅलेट बॉक्स आणणार नाही, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी स्पष्ट केले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा दोन दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. कोलकाता विमानतळावर शुक्रवारी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी अरोरा म्हणाले, बॅलेट बॉक्स वापरल्या जाणाऱ्या काळात आम्ही परत जाणार नाही. मतपत्रिका हा भूतकाळ आहे, असे सर्वोच्च न्यायालयानेही स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे ईव्हीएमच्या जागी बॅलेट बॉक्स आणला जाणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

केंद्रात भाजपाचे दुसऱ्यांदा सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रासह इतर राज्यातील भाजपा विरोधकांकडून ईव्हीएम हटवण्याची मागणी वारंवार केली जात आहे. महाराष्ट्रात विरोधकांची आघाडीच तयार झाली असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही हुतात्मा रॅलीतील सभेत बॅलेट बॉक्सवर निवडणुका घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त अरोरा यांनी बॅलेट बॉक्स परत आणण्याचा कोणताही विचार नसल्याचे सांगितल्याने विरोधकांची गोची झाली आहे.