सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदी यांचा दावा

नवी दिल्ली : देशाकडे कुणीही वाकडय़ा नजरेने पाहू शकत नाही. चीनकडून सीमेवर कोणत्याही प्रकारची घुसखोरी झाली नसून चीनला उत्तर देण्यास भारतीय लष्कर सक्षम असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत उत्तर देताना केला.

प्रत्यक्ष ताबा रेषेवर चीनच्या दुष्कृत्यामुळे प्रत्येक देशवासीयाच्या मनावर आघात झाला आहे, असे सांगत चीनने गलवान खोऱ्याच्या भूभागावर ताबा मिळवला नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.

गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षांत २० जवान शहीद झाल्याच्या गंभीर घटनेनंतर, या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. २० पक्षांच्या प्रमुखांनी चीनच्या लष्करी आणि राजनैतिक संबंधांच्या मुद्दय़ावर केंद्र सरकारला एकमुखी पाठिंबा व्यक्त केला. या प्रकरणी केंद्राच्या हाताळणीवरून काँग्रेसने मात्र परखड टीका केली.

भारत शेजारी राष्ट्रांशी शांततेने राहू इच्छितो, त्यांच्याशी मैत्रिपूर्ण संबंध ठेवू इच्छितो पण, देशासाठी सार्वभौमत्व सर्वाधिक महत्त्वाचे आहे. भारत कधीही परकीय दबावापुढे झुकलेला नाही. देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक कारवाई केली जाईल. केंद्र सरकारने लष्कराला गरजेनुसार आवश्यक कारवाई करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. देशाला आपल्या जवानांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असून अवघा देश त्यांच्या पाठिशी आहे, असे मोदी म्हणाले.

पायाभूत सुविधांचा विकास

अलीकडच्या काळात प्रत्यक्ष ताबा रेषेनजीक पायाभूत सुविधांचा विकास करण्यात आला असून देखरेखीची क्षमताही वाढवण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष ताबा रेषेवर होणाऱ्या घडामोडींची माहिती मिळत असून योग्य प्रत्युत्तरही देऊ, असे मोदींनी सांगितले. पूर्वी फारशी देखरेख नसलेल्या भूभागांवर जवानांची नजर आहे, ते तातडीने प्रत्युत्तर देत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी तिथे पायाभूत सुविधांचा विकास करण्यास महत्त्व दिले गेले. लष्करी दल, लढाऊ विमाने, अत्याधुनिक हेलिकॉप्टर वा क्षेपणास्त्रे असोत, संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबींना अग्रक्रम देण्यात आला आहे. आत्तापर्यंत चिनी सैनिकांना कोणीही आव्हान दिले नव्हेत, त्यांना कधी रोखण्याचा प्रयत्न केला गेला नव्हता, आता जवानांनी चिनी सैनिकांना रोखले, त्यांना विविध भागांमध्ये आव्हान दिले. गरजेनुसार जवान तैनात केले जातील, प्रत्युत्तर दिले जाईल, आकाश, जमीन आणि सागरी अशा कुठल्याही मार्गाचा अवलंब करून लष्कर देशाची सीमा सुरक्षित ठेवेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

काँग्रेसची मात्र प्रश्नांची सरबत्ती

चीनने ५ मे रोजी घुसखोरी केली तेव्हाच सर्वपक्षीय बैठक व्हायला हवी होती. चीनशी संघर्ष झाल्यानंतर देखील नेमके काय घडले याबद्दल देशाला अंधारात ठेवण्यात आले. कोणत्या तारखेला चीनच्या सैनिकांनी घुसखोरी केली? चीनने प्रत्यक्ष ताबा रेषेचे उल्लंघन केले हे केंद्र सरकारला कधी समजले? सरकारला या कृत्याची माहिती उपग्रहाच्या माध्यमातून मिळाली नव्हती का?  चीनच्या या आक्षेपार्ह हालचालींबाबत गुप्तहेर संस्थांकडून माहिती मिळाली नव्हती का? पूर्व लडाखमध्ये जैसे थे परिस्थिती राखली जाईल याचे आश्वासन देशाला केंद्र सरकारकडून हवे आहे. माऊंटन स्ट्राइक कॉर्पची आत्ताची स्थिती काय आहे?, असे अनेक थेट प्रश्न काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी विचारले. चीनच्या संघर्षांसंदर्भातील घडामोडींची माहिती विरोधी पक्षांना नियमित दिली जावी, अशी मागणीही सोनिया गांधी यांनी केली.

डोळे हातात काढून देऊ – उद्धव ठाकरे</strong>

शिवसेनेचे कार्याध्यक्ष व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही सारे एक आहोत. आम्ही सगळे पंतप्रधानांच्या पाठीशी आहोत. अवघा देश जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहे. भारताला शांतता हवी आहे, याचा अर्थ आपण कमकुवत आहोत असा कोणी काढू नये. धोका देणे ही चिनी प्रवृत्तीच आहे. भारत कणखर आहे, कमजोर नाही. डोळे हातात काढून देण्याची (जशास तसे उत्तर देण्याची) केंद्र सरकारची ताकद आहे.

चीनच्या ताब्यातील १० भारतीय जवानांची मुक्तता

नवी दिल्ली : गलवान खोऱ्यातील धुमश्चक्रीच्या वेळी ताब्यात घेतलेल्या दहा भारतीय जवानांना चीनने शुक्रवारी मुक्त केले. त्यांत चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे. भारत आणि चीन यांच्यात सलग तीन दिवस झालेल्या चर्चेनंतर चीनने भारतीय जवानांची मुक्तता केली.

चिनी सैनिकांनी भारताच्या हद्दीत ना घुसखोरी केली ना कुठला तळ ताब्यात घेतला.ज्यांनी भारत मातेला आव्हान दिले त्यांना धडा शिकवला जाईल. भारताकडे आता लष्करी सामथ्र्य आहे, एक इंच देखील जमिनीवर कोणी डोळा ठेवण्याची हिंमत करणार नाही. भारतीय लष्कराकडे एकाच वेळी बहुविध भूप्रदेशात चाल करून जाण्याची क्षमता आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान