तब्बल बाराहून अधिक देशांतील नौदल आणि लष्करी विमाने आणि नौकांकडून अथक शोधमोहीम सुरू असतानाही मलेशियाच्या बेपत्ता विमानाचा मागमूस लागलेला नसून विमानाच्या वैमानिकाने किंवा विमानातील तांत्रिक माहिती असलेल्या कुणातरी प्रवाशाने नैराश्याच्या भरात आत्महत्येच्या विचाराने प्रेरित होऊन हे कृत्य केले असावे, असाही तर्क पुढे आला आहे.
विमान रडारवरून बेपत्ता झाले तरी ते चार तास आकाशात घिरटय़ा घालत होते. काही उपग्रहांमार्फत त्याची नोंद झाली आहे. मात्र हे विमान भारतीय सागरी हद्दीत, अंदमान बेटांकडे नेण्यामागचे गूढ वाढले आहे. यामुळे विमानाच्या उड्डाणमार्गाचा तपशील मिळणे अवघड होईल, याच हेतूने विमानातील कुणीतरी हे कृत्य केले असावे. त्याचप्रमाणे कोणत्या तरी उपायाने कोणत्या तरी देशाशी संपर्क साधायचा प्रयत्न वैमानिकाला करता आला असता, मात्र विमानातील संपर्क यंत्रणा कोणातरी जाणकारानेच तोडल्याने ते साध्य झाले नसावे. एवढी तांत्रिक माहिती एक तर वैमानिकालाच असू शकते किंवा त्या तोडीच्या एखाद्या प्रवाशाला असू शकते. त्यामुळे नैराश्याच्या भरात त्यानेच हे कृत्य केले असावे, असा तर्क मांडला जात आहे.
 याआधी १९९७मध्ये सिल्कएअर कंपनीच्या सिंगापूर-जाकार्ता विमानाला तसेच १९९९मध्ये इजिप्त एअर कंपनीच्या लॉस एंजिलिस ते कैरो या विमानाला वैमानिकाच्या आत्महत्येच्या अविचारानेच अपघात घडले होते. त्यामुळे हा तर्क धुडकावण्याऐवजी त्या दिशेनेही तपास सुरू आहे.
दरम्यान, अंदमानच्या पश्चिमेकडील मलाक्का स्ट्रेट या बेटांलगत अमेरिकन नौदलाचे पी-३सी हे टेहळणी विमान शोध घेत आहे. या विमानात लांब पल्ल्याचे रडार आणि संपर्क यंत्रणा आहे. भारताच्या चार युद्धनौकाही शोधमोहिमेत सहभागी झाल्या आहेत.
मलेशिया एअरलाइन्सचे बीजिंगला जाणारे एमएच ३७० हे विमान गेल्या आठवडय़ात कौलालम्पूरहून उड्डाण केल्यानंतर काही तासांतच रडारवरून गूढरित्या गायब झाले. या विमानात पाच भारतीय प्रवाशांसह २२७ प्रवासी आणि १२ कर्मचारी होते.